Nagpur News : शुक्रवारी सायंकाळी शहरात अचानक वरुणराजाने (Rains) हजेरी लावली. जवळपास अर्धा ते पाऊण तास शहरात सगळीकडेच मेघगर्जनेसह जोरदार सरी बरसल्या.  अचानक आलेल्या पावसामुळे घराबाहेर पडलेल्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शिवाय रस्त्यांवरही जागोजागी पाणी साचले होते. शनिवारीही नागपूरसह संपूर्ण विदर्भात ढगाळ (Cloudy Weather) वातावरण राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागातर्फे (IMD) सांगण्यात आले आहे.


शुक्रवारीही दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे हवेत दमटपणा वाढून थोडाफार उकाडाही होता. मात्र सायंकाळी सहानंतर अचानक वातावरण बदलले. सुरुवातीला काही भागांत हलक्या सरी बरसल्यानंतर 7 वाजल्यानंतर मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. मध्य नागपुरातील रामदासपेठ, धंतोली, सीताबर्डीसह मेडिकल, मानेवाडा, महाल, इतवारी, बेसा, बेलतरोड, वर्धा रोड, खामलासह वाडी, एमआयडीसी, हिंगणा इत्यादी भागांत जवळपास अर्धा ते पाऊण तास अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू होता. 


अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना आडोश्याचा आधार घ्यावा लागला. तर काहींना छत्री व रेनकोट अभावी ओल्या अंगाने भिजत घराकडे परतावे लागले. पावसामुळे वातावरण आल्हाददायक बनल्याने तरुणाईने आनंदही घेतला. 


4.9 मिमी पाऊस; थंडी गायब


बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र मध्य भारताकडे वळले आहे. त्यामुळे थंडीचा प्रभाव कमी झाला आहे. मॅन डौस चक्रीवादळाचा अद्याप कायम असल्याने ढगांचे आच्छादन कायम आहे. त्यामुळे नागपूरसह विदर्भात ढगाळ वातावरण आहे. पण पाऊस होईल असा अंदाज नव्हता. मात्र सकाळपासून बदललेल्या वातावरणामुळे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हलक्या पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने 4.9 मिमी पावसाची नोंद केली आहे. दरम्यान ढगाळ वातावरणामुळे रात्री व दिवसाचे तापमान वाढलेले असल्यामुळे थंडी गायब झाली आहे.


हवामान विभागालाही आश्चर्याचा धक्का


उल्लेखनीय म्हणजे, हवामान विभागाने विदर्भात तीन-चार दिवस ढगाळ वातावरणासह 'ड्राय वेदर' राहणार असल्याचे म्हटले होते. मात्र वरुणराजाने अचानक हजेरी लावून हवामान विभागालाही आश्चर्याचा धक्का दिला. आजचा पाऊस हा 'लोकल डेव्हलपमेंट' चा परिणाम असल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी शनिवारी पावसाची शक्यता नसल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे.


अनेक भागांची बत्ती गुल


शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे शहरातील काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला. विधिमंडळ अधिवेशनाशी संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होता. महावितरणच्या सूत्रानुसार मानकापूर सब स्टेशनच्या 33 केव्ही लाइनमध्ये पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला. थोड्या वेळात बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र या दरम्यान गोधनी, मेकोसाबाग, कडबी चौक परिसरात अंधार पसरला. त्याचप्रकारे वाठोडा येथील 33 केव्ही अंडरग्राऊंड लाइनमध्येसुद्धा तांत्रिक बिघाड आल्याने परिसरातील बत्ती गुल झाली होती.


ही बातमी देखील वाचा


नागपुर सुधार प्रन्यासतर्फे भूखंड वितरणात गैरप्रकार; न्या. एमएन गिलानी समितीचा अहवाल सादर