वर्धा : वर्धा जिल्ह्याच्या देवळी तालुक्यात सोनेगाव (आबाजी) परिसरात बॉम्ब निकामी करताना भीषण स्फोट झाला. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला असून दहा जण जखमी झाले आहे. जखमींना सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं असून चौघांची प्रकृती गंभीर आहे. हे ठिकाण पुलगावमधील दारुगोळा भांडारापासून आठ किमी अंतरावर आहे.
वर्ध्यातील देवळी तालुक्यातील सोनेगाव आबाजी परिसरात आज सकाळी सात वाजून 10 मिनिटांनी ही दुर्घटना घडली. जबलपूर खामरिया ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील कर्मचाऱ्यांना जुने आणि वापरात नसलेले बॉम्ब निकामी करण्यासाठी बोलवण्यात आलं होतं. यावेळी 23 एमएम स्फोटकं चुकीच्या पद्धतीने हाताळली गेल्याने स्फोट झाल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये खामरिया ऑर्डिनन्स फॅक्टरीच्या कर्मचाऱ्यासह सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा वर्ध्यातील पुलगावमध्ये आहे. दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. पुलगावमध्ये दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये स्फोट होऊन आग लागली होती, ज्यात 16 जवान शहीद झाले होते.
मृतांची नावं
राजकुमार राहुल बाहुते (वय, 23 वर्ष), केलापूर
प्रभाकर रामदास वानखेडे (वय, 32 वर्ष), सोनेगाव
नारायण शामराव कचरे (वय, 48 वर्ष), सोनेगाव
प्रवीण प्रकाश मुंजेवार (वय, 25 वर्ष), केलापूर
विलास लक्ष्मणराव पाचरे, (वय, 36 वर्ष), सोनेगाव
उदयवीर सिंह, (वय, 27 वर्ष) कर्मचारी, ऑर्डनन्स फॅक्टरी
आता पुन्हा या ठिकाणी स्फोटकं निकामी करताना स्फोट झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी प्रशासन, लष्करी अधिकारी दाखल झाले आहेत.
ठेकेदार आणि लष्करी अधिकाऱ्याचा गोरखधंदा : शेतकरी
ठेकेदार आणि लष्करी अधिकाऱ्यांच्या गोरखधंद्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिक शेतकरी सतीश दाणी यांनी केला आहे. त्यांच्या आरोपानुसार, "पुलगावचे ठेकेदार अशोक चांडक आणि शंकर चांडक यांनी मिलिट्रीमधील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरुन गेल्या चार-पाच वर्षांपासून गोरखधंदा सुरु आहे.जे काम लष्करातील कर्मचाऱ्यांनी करायला हवं, ते काम गावातील लोकांकडून करुन घेतलं जातं. मजूर म्हणून वापरले जातात. यामधून कोट्यवधींची माया या ठेकेदारांनी कमावली आहे.
"आज ज्या लोकांचे जीव गेले आहे, त्यासाठी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणी वारंवार तक्रार करुनही कोणतीही दखल घेतलेली नाही. हे प्रश्न केंद्राच्या अखत्यारित असल्याचं सांगून बोळवण केली जाते," असंही दाणी यांनी सांगितलं.
संरक्षण मंत्र्यांना मदतीसाठी फोन : सुधीर मुनगंटीवार
"या स्फोटाप्रकारणी मी संरक्षण मंत्र्यांना मदतीसाठी फोन केला आहे. या प्रकरणी आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसंच उच्चस्तरीय समिती गठित करुन चौकशी केली जाईल. शिवाय पैसे वाचवण्यासाठी सुरक्षेत काही तडजोड केली आहे का, याचाही तपास केला जाईल," अशी माहिती राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्रास्त्र भंडार
पुलगाव दारुगोळा भांडार हे भारतीय लष्कराच्या सर्वात मोठ्या दारुगोळा भांडारापैकी एक आहे. तर आशियातील दुसऱ्या क्रमांकाचं दारुगोळा भंडार आहे.
इथे दारुगोळा बनवण्यासोबतच मोठा शस्त्रसाठाही आहे. त्यामुळे हा परिसर संवेदनशील आहे. पुलगाव दारुगोळा भांडाराचा संपूर्ण परिसरत सुमारे 28 किलोमीटरचा आहे. या परिसरात लष्कराच्या जवानांव्यतिरिक्त कोणालाही प्रवेश नाही.
इथे शस्त्रास्त्रांचा साठा असल्यामुळे साहजिकच मोठ्या सुरक्षा व्यवस्थेचं कवच असतं. शस्त्रास्त्रांचे अनेक बंकर बनवलेले असतात. प्रत्येक बंकरमध्ये सुमारे 5 ते 6 हजार किलो शस्त्रास्त्रांचा साठा असतो.