नागपूर : स्वतःचं जिम सुरु करण्याच्या महत्त्वाकांक्षेतून नागपुरातील दोन बॉडीबिल्डर्सनी चुकीचा मार्ग पत्करला. सहा लाखांची घरफोडी केल्याप्रकरणी दोघा बॉडीबिल्डर आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.


अफसर खान आणि अक्रम खान अशी आरोपींची नावं आहेत. दिवाळीच्या सुट्टीत अनेक कुटुंबं फिरायला शहराबाहेर गेल्याची संधी साधून दोघा चोरट्यांनी घरफोडी सुरु केली होती.

दोघांनी काही दिवसांपूर्वी कालिचरण ताकभवरे यांच्या घरी चोरी करत सहा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. त्यावेळी ताकभवरे कुटुंब हिमाचल प्रदेशातील कुलू-मनालीला फिरायला गेलं होतं. दोन्ही आरोपींना फिर्यादींचं घर रिकामं असल्यावची टीप मिळाली असावी, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे.

कालिचरण ताकभवरे यांच्या बंद घराचा कानोसा घेत आरोपींनी रात्रीच्या वेळेस मागचं दार तोडून घरात प्रवेश केला. घरातून 15 तोळे सोन्याचे दागिने, दोन एलसीडी टीव्ही आणि 60 हजार रुपयांची रोकड असा सहा लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता.

सुरुवातीला पोलिसांनी परिसरातील संपूर्ण सीसीटीव्ही फूटेज तपासलं. त्यामध्ये दिसणाऱ्या दोन्ही बॉडीबिल्डर्सना संशयाच्या आधारे ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करत त्यांना अटक केली आहे.

अटक झाल्यानंतर दोन्ही बॉडीबिल्डर्सनी या चोरीमागील वेगळीच कहाणी पोलिसांना सांगितली.आरोपीना बॉडीबिल्डिंगची हौस असून दोघे जिम ट्रेनर म्हणून काम करतात. स्वतःच्या मालकीची जिम सुरु करण्यासाठी साहित्य खरेदी करायचं होतं. मात्र जसा जिममध्ये घाम गाळून शरीर कमावलं, तसाच कष्टाने पैसा मिळवला असता, तर दोघांवर तुरुंगात जाण्याची वेळ आली नसती.