Nagpur News नागपूर: नागपूर शहरासह (Nagpur News) विदर्भात (Vidarbha) सलग दुसऱ्या दिवशी गारपीट आणि अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) फटका बसला आहे. या गारपिटीमुळे हरभरा गहू, तूर, भाजीपाला आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यात आजही हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काल संध्याकाळी पुन्हा बरसलेल्या दमदार पावसाने (Unseasonal Rain) विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यातील शेतकाऱ्यांच्या शेतमालाची दाणादाण उडवली आहे. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिक वाढ झाली असून प्रशासनाने तत्काळ या भागांचा पंचनामा करून नुकसान भरपाई स्वरूपात मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकाऱ्यांकडून केली जात आहे.
कापसाचा वाती झाल्या
विदर्भात सर्वाधिक नुकसान हे कापसाच्या पिकांचे झाले आहे. राज्यात 45 लाख हेक्टरवर कापसाचे पीक घेण्यात येतं. त्यातील सर्वाधिक कापसाचे पीक हे एकट्या विदर्भात घेतले जातं. पावसाचा फटका हा कापसाच्या पिकाला देखील बसला आहे. वेचणीला आलेला कापूस पावसात भिजल्याने कापसाचा वाती झाल्या असल्याचे चित्र आहे. त्यामुळे हाता तोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून घेतल्याने पुन्हा एकदा शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कापसासह रब्बी हंगामातील काढणीला आलेला हरभरा, गहू, सोयाबीन, मुंग इत्यादी पिकांची नासाडी झाली आहे. आधीच शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने डबघाईला निघालेला शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडलेला आहे.
उमरखेड महागाव, बाभूळगाव तालुक्याला गारपिटीचा तडाखा
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून गारपीट आणि अवकाळी पावसामुळे उमरखेड, महागाव, बाभुळगाव या तीन तालुक्यातील चना, गहू, तूर या पिकांना तडाखा बसला आहे. यावर्षी सुरवातीला खरिपात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे कपाशी आणि सोयाबीनचे नुकसान झाले होते. तर रब्बी हंगामातील चना आणि गहू काढणीला येत असताना पुन्हा अवकाळीचा फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा हरभरा, गहू यासह विविध पिके आज झालेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने धोक्यात आली आहेत. अवकाळी पावसामुळे यावर्षी सुरुवातीलाच काही शेतकऱ्यांनी हरभरा मोडून नव्याने पेरला आणि त्यात आज पुन्हा भर म्हणून अवकाळी पाऊस आणि गारपीट पडल्याने शेतकऱ्यांचे रब्बी हंगामाचे स्वप्न धुळीस मिळवले आहे. आजपर्यंत खरिपातील पिकविमाचे मदत मिळाली नसून आता आलेल्या या संकटामुळे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
जिथे नुकसान, तेथे सरकार मदत करेल
अवकळी पावसाचा फटका हा प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांना बसला आहे. या बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर दौऱ्यावर आले असता अवकाळी पावसाच्या बाबतीत आम्ही सगळीकडे लक्ष ठेवून आहोत. त्याचबरोबर पावसामुळे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देखील आम्ही दिलेले आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.
अवकाळी पावसामुळे विदर्भासह राज्याच्या विविध भागांत झालेल्या नुकसानाबद्दल विचारले असता फडणवीस म्हणाले, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान बघता त्यासंबंधीची नुकसान भरपाई शक्य तितक्या लवकर देण्यात येईल. त्यामुळे जिल्हा पातळीवर नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे नुकसान होईल, त्याठिकाणी आपण मदत करतोच. मात्र, नुकसान होऊ नये, या दृष्टीनेदेखील सतर्कता ठेवण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे देखील उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या