Weather Update Today  नागपूर: गेल्या काही दिवसांपासून  विदर्भात (Vidarbha)  परत एकदा थंडीचा (Winter) कडाका वाढलाय. त्यामुळे वातावरणाचा वेगळा अनुभव विदर्भवासियांना येत आहे. पावसाळी वातावरणामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात कमाल तापमानात माठी घसरण झाली, तर किमान तापमानात देखील बदल जाणवत आहे.

त्यामुळे पहाटे आणि संध्याकाळनंतर थंडीचा गारवा आहे. मात्र दिवसा काही अंशी उकडा जाणवत आहे. हवामानाचा (Weather Update) असा अनुभव नागरिकांच्या आराग्यासाठी धोकादायक ठरला असून सर्दी, खाकला आणि  इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मागील तीन दिवसांपासून विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात आकाश ढगांनी व्यापले आहे. नागपुरात मंगळवारी सकाळी हलक्या पावसाचे थेंबही पडले. त्यामुळे कमाल तापमानात आणखी घसरण झाल्याचे चित्र आहे. 

नागपूर जिल्हा गारठला, तापमान  8.7 अंशावर 

जानेवारीच्या उत्तरार्धात राज्यात तापमान कमालीचे घसरले असून दिवसाही कमालीचा गारवा असल्याने सर्वत्र हुडहुडी पसरली आहे. पुढील दोन दिवस कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी किमान तापमानात घट होणार आहे, असा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे.  अशातच  विदर्भात परत एकदा थंडीचा कडाका वाढलाय. आज 25 जानेवारीला विदर्भातील सर्वाधिक कमी तापमान हे नागपूरचे नोंदविण्यात आले आहे. गुरुवारी नागपुरातील पारा 5.9 अंशांनी घसरून किमान तापमान 8.7 अंश सेल्सिअसवर पोहचले आहे. त्या खालोखाल यवतमाळ येथे आज 9 अंश सेल्सिअसवर किमान तापमानची नोंद करण्यात आली आहे. तसेच उर्वरित विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात थंडीची लाट पसरली असल्याचे चित्र आहे. 

असे आहे विदर्भाचे तापमान

   जिल्हे  कमाल किमान
अकोला       29.1  9.5 
अमरावती    27.6 12.0 
बुलढाणा      26.0  10.0
ब्रम्हपुरी    27.2  11.8 
चंद्रपूर    28.8  11.0
गडचिरोली      25.0 11.2
गोंदिया    24.5  9.5 
नागपूर  27.2  8.7 
वर्धा  29.0 10.6 
वाशिम    28.6  14.0 
यवतमाळ     29.5  9.0

भंडाऱ्यात हुडहुडी, नागरिकांनी घेतला शेकोटीचा आधार

भंडारा जिल्ह्यात 22 जानेवारीच्या रात्री पडलेल्या अवकाळी पावसामुळं तापमानात घट होऊन हुडहुडी वाढली आहे. बुधवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं तापमानात बरीच घट झाली आहे. बुधवारी संपूर्ण दिवस आणि रात्री भंडारावासियांना थंडीने चांगलचं हैराण केलं. हुडहुडी भरणाऱ्या थंडीमुळं नागरिकांनी कपाटात ठेवलेली उबदार कपडे बाहेर काढलीत. काल रात्री आणि आज पहाटेपासून नागरिकांनी शेकोटी पेटवून थंडीपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. गुरुवारीही थंडीची लाट कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

आणखी वाचा