नागपूर: अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणात अटकेत असलेल्या आरोपीने पोलीस कोठडीत बंद असताना गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आल्याने ही दुर्घटना टळली आहे. शेख तौसीफ शेख फैजान असे या 23 वर्षीय आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तो नागपूरच्या शहंशाह चौक, मोठा ताजबाग येथे राहतो. या घटनेमुळे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे.
आधी अपहरण, मग बलात्कार आणि अखेर आत्महत्येचा प्रयत्न
अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात तौसिफला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख तौसीफने एका अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दरम्यान तौसीफने अनेक आश्वासन देत आपण लग्न करू असे देखील सांगितले. त्यामुळे पीडित मुलीने तौसीफवर विश्वास दर्शवला आणि ती मुलगी शिक्षण सोडून तौसीफच्या प्रेमात बुडाली. तसेच या संधीचा फायदा घेत तौसीफने तिला पळून जाऊन लग्न करण्याचे देखील आमिष दाखवले.
गेल्या आठवड्यात पीडित मुलीचे आईवडील मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर तौसीफने तिला घरातून पळवून नेले. कालांतराने ही बाब आई वडिलांच्या लक्षात आल्यावर मुलगी अचानक बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करीत मुलीचा शोध सुरू केला. दरम्यान 21 जानेवारीला मुलगी तौसीफसोबत सापडली. त्यानंतर पोलिसांनी तौसीफला अटक करून त्याला न्यायालयात नेले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते.
मोठी दुर्घटना टळली
दरम्यान, 22 जानेवारीच्या संध्याकाळी साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नंदकिशोर तायडे हे नेहमीप्रमाणे लॉकअप ड्युटीवर (गार्ड ड्युटी) होते. सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास तपास अधिकारी आठवले यांनी तौसिफला तपासासाठी कोठडीतून बाहेर काढले. सायंकाळी साडे सातच्या दरम्यान त्याला परत लॉकमध्ये टाकले. त्यावेळी रात्री दहा-साडे दहाच्या सुमारास तायडे यांना लघुशंका आली. त्यांनी सहकाऱ्यांना तौसिफकडे लक्ष देण्यास सांगून ते लघुशंकेला गेले.
याचदरम्यान तौसिफने ब्लॅकेटची कापडी किनार उसवली. ती लोखंडी सळाखीला बांधून गळफास घेतला. मात्र तो प्रकार सहकाऱ्यांना दिसताच त्यांनी आरडाओरड केली. आवाजाने उपनिरीक्षक माधव गुंडेकर, अंकुश वाळके, नरेश डवरे तसेच तायडे यांनी कोठडीकडे धाव घेतली. तायडे यांनी चावीने कोठडीचे कुलूप उघडले आणि तत्काळ फास काढून तौसिफला मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना वेळीच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या त्याची प्रकृती स्थिर असून पोलिसांनी तौसिफविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
इतर महत्वाची बातम्या