Nagpur : उत्तम संघटक, व्यवस्थापक, खेळाडू, साहित्याचे जाणकार आणि अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे धनी असलेले विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांचे शुक्रवारी सायंकाळी उपचारा दरम्यान निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. दोनच दिवसांपूर्वी त्यांना येथील विवेका रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. तिथे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते. त्यांच्या मागे दोन विवाहित मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पत्नी माधवी यांचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाल्यापासून ते मुलगी अर्चना देव यांच्याकडे राहात होते. न्या. राहित देव हे त्यांचे जावई होते.  


गेल्या 16 वर्षांपासून विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले असून 50 वर्षांपासून ते विदर्भ साहित्य संघाचे सदस्य होते. त्यांच्या निधनाने विदर्भ साहित्य संघाचे 'मॅनेजमेंट गुरु' हरविल्याची भावना साहित्य वर्तूळाने व्यक्त केली.


किडनीच्या आजाराने ग्रासल्याने त्यांना गुरुवारी, 13 ऑक्टोबर रोजी नागपुरातील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. या रूग्णालयात त्यांनी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान अंतिम श्‍वास घेतला. उद्या नागपुरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्‍चात दोन मुली, जावई, बहीण, भाऊ, नातवंडे आणि बराच मोठा आप्त परिवार आहे. प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा 15 वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर 2006 साली त्यांनी विदर्भ साहित्य संघाची धुरा आपल्या हाती घेतली. मनोहर म्हैसाळकर 2006 सालापासून विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्षपदाची धुरा एक हाती सांभाळत होते.


साहित्यासह सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या, आपल्या कुशल संघटन कौशल्याने साहित्य संघाला नवे भव्य स्वरूप देणाऱ्या मनोहर म्हैसाळकर यांच्या सारख्या दिग्गज व्यक्तिमत्त्वाने विदर्भ साहित्य संघाचे कार्य केवळ विदर्भापुरते मर्यादित न ठेवता महाराष्ट्रात पसरविले. यामुळे, साहित्य संघास अग्रणी स्थान प्राप्त झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भासह महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळात शोककळा पसरली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर संदेश लिहीत आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.


स्वेच्छा निवृत्ती अन्  सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय


त्यांचा जन्म यांचा जन्म अमरावतीला झालेला होता. त्यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत अमरावतीच्या शिवाजी महाविद्यालयमध्ये झाले होते. त्यानंतर ते नागपूरला काही काळ सोमलवार हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला होते. यानंतर जवळपास 26 वर्ष त्यांनी मॅगनीज और इंडियातही काम केले. तिथून स्वेच्छा निवृत्ती घेऊन ते साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय झाले. 1983 मध्ये ते विदर्भ साहित्य संघाचे सरचिटणीस झाले. 2006 पासून अध्यक्ष होते. यावर्षी झालेल्या निवडणुकीत सलग चवथ्यांदा अध्यक्षपदी निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. साहित्य संघाचे नेतृत्व एखाद्या तरुण, उमद्या, धडपड्या व्यक्तीकडे न सोपवता स्वत: त्या पदाला चिकटून बसले आहेत, अशी अशी टीका त्यांच्यावर झाली होती. 1972 मध्ये ते साहित्य संघात आले. तेव्हापासून गेली 50 वर्ष साहित्य संघाशी जुळलेले होते.


साहित्य संघाचे हे शतकमहोत्सवी वर्ष आहे. संघातर्फे विविध कार्यक्रमही सुरू आहे. पुढील वर्षी 2023 मध्ये वर्धा येथे साहित्य संमेलन होत आहे. अशा वेळी म्हैसाळकरांच्या मार्गदर्शनाची गरज असताना ते गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 2007 मध्ये साहित्य संमेलन नागपुरात खेचून आणण्यात मनोहर म्हैसाळकरांचा सिंहाचा वाटा होता. साहित्य, संस्कृतीसह अनेक संस्था व संघटनांशी त्यांचा संबंध होता. विदर्भ साहित्य संघाच्या जुन्या वास्तू पासून नवीन वास्तू पर्यंतच्या प्रवसाचे ते साक्षीदार होते. तसेच विदर्भ साहित्य संघाच्या हिरक महोत्सव, अमृत आणि शतक महोत्सव चे ते साक्षीदार होते.


मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या निधनाने साहित्‍य क्षेत्राची अपरिमीत हानी - सुधीर मुनगंटीवार


विदर्भ साहित्‍य संघाचे अध्‍यक्ष मनोहर म्‍हैसाळकर यांच्‍या निधनाने अभ्‍यासू वक्‍ता, भाषा अभ्‍यासक, सर्जनशील लेखक, अभ्‍यासक व संशोधक हरपल्‍याची शोकभावना सांस्‍कृतीक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केली आहे. मनोहर म्‍हैसाळकर यांनी साहित्‍य क्षेत्रात बहुमोल योगदान दिले आहे. गेल्‍या 10 वर्षापासून विदर्भ साहित्‍य संघाच्‍या अध्‍यक्षपदाची धुरा त्‍यांनी समर्थपणे सांभाळली. वाड्.मयाच्‍या क्षेत्रात त्‍यांनी आयुष्‍यभर मोलाचे योगदान दिले आहे. विदर्भ साहित्‍य संघ म्‍हणजे मनोहर म्‍हैसाळकर असे जणू समीकरणच बनले होते. त्‍यांच्‍या निधनाने साहित्‍य क्षेत्राची अपरिमीत हानी झाली आहे, असेही सुधीर मुनगंटीवार यांनी शोक संदेशात म्‍हटले आहे.


एक चांगला व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला: फडणवीस


विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहरराव म्हैसाळकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने केवळ एक उत्तम साहित्यिकच नाही, तर एक चांगला संघटक, व्यवस्थापक, खेळाडू आपल्यातून हिरावला गेला आहे. अनेक दिग्गज साहित्यिक आणि लेखकांना एका सूत्रात बांधण्याचे काम मनोहररावांनी केले. मनोहररावांचे आशिर्वाद असले की, साहित्यातील कुठलेही आयोजन यशस्वीच होते, अशी त्यांची ख्याती. आताही वर्ध्यातील आगामी 96 व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी स्वत:ला झोकून दिले होते. केवळ विदर्भ साहित्य संघच नव्हे, तर अनेक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळून संबंध आला. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला. संपर्कात आलेल्या अनेक संस्था त्यांनी वि.सा.संघाशी जोडल्या. या जाणकार साहित्यिकाचे निधन ही साहित्यजगताची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशी भावना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या 2759 वर, सर्वाधिक रुग्ण मुंबई शहरात


मुंबई, पुण्यासह राज्याला परतीच्या पावसानं झोडपलं, शहरातील रस्ते पाण्यात, गावखेड्यात नदी-नाले तुडुंब