Uddhav ThackerayShiv Sena Nagpur News : नागपुरात ठाकरे गटावर कार्यालय रिकामं करण्याची नामुष्की ओढवली आहे.  वर्षभराचे भाडे आणि वीज बिल थकवल्याने गणेशपेठ येथील कार्यालय सोडण्याची वेळ आली आहे. एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदार आणि खासदारांना पळवल्यानंतर कार्यकर्ते जोडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. असे असताना आता विभागीय कार्यालय सुद्धा शिवसेनेकडे उरले नाही.


शिवसेना कोणाची असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणावर शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेनेने दावा केला आहे. त्याविरोधात उद्धव ठाकरे यांच्या सेनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शिंदे सेनेने खासदार, आमदारांसह शिवसेनेचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्तेसुद्धा पळवले आहेत. महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून उद्धव ठाकरे सक्रिय झाले आहेत. सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना त्यांनी मुंबईत बोलावून बैठका घेतल्या.


उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अधिकृत कार्यालय रेशिमबाग येथे  आहे या कार्यालयाची नोंदणी देखील पक्षाच्या नावावर आहे. मी शिवसेनेसोबत कार्यरत असल्यापासून या कार्यालयातच काम केले आहे. मात्र पक्षाच्या विस्तारासाठी तानाजी सावंत संपर्क प्रमुख असताना गणेशपेठ येथे दुसऱ्या कार्यालयाची सुरुवात केली होती, अशी माहिती  शिवसेना उद्धव ठाकरे गटचे जिल्हाप्रमुख कुशोर कुमेरिया यांनी दिली आहे.


संजय राऊत यांचे दोन दौरे...


भाजप आणि शिंदे सेनेसोबत दोन हात करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी विदर्भाचे दोन दौरे केले. काही दिवस ते मुक्कामीसुद्धा होते. भाजपसाठी जागा सोडल्या ही आमची चूक झाल्याचे मान्य करून विदर्भात सेनेला पुन्हा बळकट करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. या दरम्यान शिवसेनेच्या बैठका शिवसेनाभवना ऐवजी नागपूरचे संपर्क नेते दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यालयात होत असल्याने अनेकांनी आक्षेपसुद्धा नोंदवला होता. मुंबईपर्यंत याच्या तक्रारी काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. याची दखल घेऊन पक्षसंघटनेची बैठक शिवसेना भवनातच घ्यावी असे आदेशही मुंबईच्या नेत्यांनी दिले होते. मात्र याची दखल कोणी घेतली नाही. आता तर शिवसेनेचे कार्यालयाच अस्तित्वात राहिले नाही.


...म्हणून गणेशपेठमधील विभागीय कार्यालय रिकामं


शिवसेनेचे सतीश हरडे हे नागपूरचे जिल्हा प्रमुख असताना 2014 मध्ये गणेशपेठ येथे शिवसेना भवनासाठी कार्यालय भाड्याने घेण्यात आले होते. 20 हजार रुपये भाडे आणि इलेक्ट्रिक बिल सेनेला भरायचे होते. तीन ते चार वर्षे कार्यालय सुरू होते. महापालिकेच्या निवडणुकीचे एबी फॉर्मचे वाटप याच कार्यालयातून झाले होते. प्रकाश जाधव जिल्हा प्रमुख झाल्यानंतर सात ते आठ महिने कार्यालयातून कामकाज चालत होते. त्यानंतर शिवसेनेची कार्याकारिणी बदलली आणि शिवसेना भवनातही कोणी फिरकेनासे झाले. त्यामुळे भाडे थकले. शेवटी जागा मालक किशोर राय यांनी कार्यालय रिकामे करायला लावले. ही जागा दुसऱ्याला भाड्यानेसुद्धा देण्यात आली आहे.


ही बातमी देखील वाचा...


पालकांनो, मुलं मोबाईलमध्ये काय करता याकडे लक्ष द्या; नागपुरात 12 वर्षीय मुलाचा गेला जीव