नागपूर: आमदार अपात्रतेबाबतच्या (Shiv Sena MLA Disqualification Case) याचिकेवर आज  मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी पार पडणार आहे. अशातच उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेच्या महिला शिवसैनिक आता मैदानात उतरल्या आहेत. आज 17 जानेवारीला देशाच्या मध्यभागी असलेल्या नागपुरात शिवसेनेची महिला आघाडी स्त्री शक्ती संवाद यात्रा काढणार आहे. या यात्रेतून संपूर्ण राज्यातील महिलांशी संवाद साधला जाणार आहे. या यात्रेची सुरुवात नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथून सुरू होऊन नंतर विदर्भातील विधानसभा मतदारसंघाचा सखोल आढावा घेतला जाणार आहे. 


तीन दिवस पश्चिम विदर्भात संवाद यात्रा


शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल 16 जानेवारीला महापत्रकार परिषद घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात दिलेला निकाल कसा चुकीचा होता, याबाबतचे दावे केले. त्यानंतर आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या महिला शिवसैनिक मैदानात उतरल्या आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने राज्यात स्त्री शक्ती संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या संवाद यात्रेचा प्रारंभ आज, 17 जानेवारीला विदर्भातून सुरू होणार आहे. त्यानंतर 17 ते 19 जानेवारी असे तीन दिवस पश्चिम विदर्भात संवाद यात्रा होईल.


या यात्रेदरम्यान अमरावती, यवतमाळ, वाशीम आणि  रामटेक मतदारसंघातील महिलांशी संवाद साधला जाणार आहे. या संवाद यात्रेच्या माध्यमातून विदर्भातील महिलांच्या भविष्य आणि उर्जेला गती देण्याचे काम करणार असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर म्हणल्या. या यात्रे निमित्य नागपुरात आल्या असता त्या बोलत होत्या.  


वर्तमान आणि भविष्य घडवायला स्त्री शक्ती संवाद यात्रा


राज्यात चांदा ते बांदा असे म्हटले जातं. त्यामुळे नागपूर देशाच्या मध्यभागी असल्याने आम्ही उपराजधानी नागपूर येथून या यात्रेची सुरुवात करत आहोत. महाराष्ट्रात कायम भूतकाळातले प्रश्न काढले जातात, आपण त्यात फार रमत असतो. मात्र वर्तमान काय आहे, याचा विचार केला जात नाही. त्यामुळे वर्तमानाला शोधायला आणि भविष्य घडवायला हा स्त्री शक्तीचा संवाद या यात्रेतून ठेवला आहे. राज्यातील सर्व लोकसभा आणि विधानसभांचा दौरा करून मग आम्ही मुंबईत पोहोचू. या यात्रेदरम्यान विदर्भातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत महिलांशी संवाद साधण्यात येणार असल्याचे किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 


जनता जागा दाखवणार


आम्हाला कोणालाही जागा दाखवायची गरज नाही. आगामी काळात जनता सगळ्यांना त्यांची जागा दाखवणार आहे. आम्ही फक्त आमचा पक्ष आणि पक्ष प्रमुखांसोबत असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी उर्जा आहे त्या उर्जेला गती देण्याचे काम या यात्रेतून करणार आहोत, असेही पेडणेकर म्हणाल्या. जागावाटपाचा फॉर्म्युला पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील, तेव्हा तो समोर येईलच. मात्र जागावाटपापेक्षा जे जागेवर आहे त्यांना कशी चालना द्यायची, जे उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा ठेवून त्यांच्यासोबत थांबले आहे, त्यांच्यासोबत संवाद साधून त्यांच्या वर्तमानातील आणि भविष्यातील काही प्रश्न आहेत  यावर विचार करायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या पर्यंत या यात्रेतून पोहचू. असे देखील किशोरी पेडणेकर म्हणाल्या. 


ही बातमी वाचा: