नागपूर : मुख्यमंत्र्यांचे होमटाऊन असलेल्या नागपुरात गुन्हेगारी घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नववर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान वेगवेगळ्या घटनेत नागपुरात एका गुंडासह अन्य एकाची हत्या झाली आहे तर एक जण गंभीर आहे. यातील पहिली घटना इमामवाडा तर दुसरी घटना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. या घटनांमुळे
नागपूरमध्ये नववर्षाच्या उत्साहाला गालबोट लागले आहे.

पहिली घटना MIDC पोलीस स्टेशन अंतर्गत राजीव नगर मध्ये घडली. इथला कुख्यात गुंड रणजीत लडी याला आणि त्याच्या एका साथीदाराला परिसरातील लोकांनी जबर मारहाण केली. यात रणजीत लडीचा मृत्यू झाला असून त्याचा सहकारी गंभीर जखमी आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे दोघेही परिसरातील सामान्य लोकांची लुटमार, दमदाटी करायचे.  त्रासलेल्या लोकांनी गुंडांचा स्वतः बंदोबस्त केला. रात्री 12 च्या सुमारास ही घटना घडली.

दुसरी घटना इमामवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत जाटतरोडी मध्ये घडली. आकाश वाघमारे या तरुणाची तीन ते चार लोकांनी हत्या केली. ही हत्या देखील सेलिब्रेशन दरम्यान झालेल्या वादातून करण्यात आल्याचे समजते. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. या दोन्ही घटनांमुळे नागपूरमधील उत्साहाला गालबोट लागले.