नागपूर : सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. अशातच नागपुरात घडलेल्या घटनांनी संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. नागपुरात अवघ्या काही तासांच्या अंतरावर दोन कोरोना बाधित वृद्धांनी गळफास लावून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे.
पहिली घटना नागपूरमधील सर्वात मोठं सरकारी रुग्णालय म्हणजेच, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डमध्येच घडली. 81 वर्षांच्या पुरुषोत्तम गजभिये नावाच्या वृद्ध व्यक्तीनं वॉर्डच्या बाथरूममध्ये काल संध्याकाळी गळफास लावून घेतला. पुरुषोत्तम गजभिये यांना कोरोनाचं निदान झाल्यांनतर 26 मार्च रोजीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी बाथरूममध्ये गेलेले पुरुषोत्तम गजभिये बराच वेळ बाहेर न आल्याने रुग्णालयातील स्वच्छता कर्मचाऱ्याला शंका आली. त्याने डॉक्टरांना ही बाब सांगितली त्यानंतर कोरोना बाधित वृद्धाच्या आत्महत्येची घटना समोर आली. 26 मार्च रोजी रुग्णालयात दाखल केल्यांनतर पुरूषोत्तम यांची अवस्था जाणून घेण्यासाठी कुटुंबिय रुग्णालयाकडे फिरकलेही नव्हते. त्यामुळे नैराश्यात त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे अशी शंका व्यक्त केली जात आहे.
दुसरी घटना नागपुरातील अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत पंच्याशी प्लॉट परिसरात घडली. वसंतराव कुटे या 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं आज सकाळी राहत्या घरीच गळफास लावून आत्महत्या केली. वसंतराव कुटे यांना 26 मार्च रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वसंतराव कुटे आधीच मुतखड्याच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या कुटुंबातील इतर काही सदस्यही कोरोना बाधित असल्याची माहिती मिळत आहे. आजारपणातील नैराश्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असावी अशी माहिती अजनीचे पोलीस निरीक्षक विजय चौधरी यांनी दिली आहे.
नागपुरात गेलं काही आठवडे कोरोनाचा थैमान सुरु आहे. रोज तीन आणि चार हजारांच्या घरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. शिवाय मृतांचा आकडाही वाढताच आहे. त्यामुळे कोरोनाची भीती आता लोकांच्या मनावर खासकरून वृद्धांच्या मानसिकतेवर नकारात्मक प्रभाव पाडत आहे का? आणि कोरोनाच्या तणावात आणि भीतीमुळे लोकं आत्महत्या करत आहेत का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही तासांच्या फरकानं घडलेल्या दोन आत्महत्यांच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :