नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने शहरातील सावरकर चौक (ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौक) परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. पौर्णिमा दिवसानिमित्ताने वीज बचतीच्या जनजागृतीची संकल्पना तत्कालीन महापौर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी मांडली होती. त्यांच्या संकल्पनेनुसार अजूनही मनपा आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनद्वारे पौर्णिमा दिनानिमित्त शहरातील विविध भागात जनजागृतीचे आवाहन करण्यात येत आहे.


जनजागृती उपक्रमादरम्यान ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील दुकाने, आस्थापनांना भेट देउन तिथे वीज बचतीचे महत्व सांगितले व नागरिकांना किमान 1 तास अनावश्यक विद्युत दिवे बंद करण्याचे आवाहन केले. परिसरातील व्यापारी बांधवांनीही मनपा व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत विद्युत दिवे बंद करून उपक्रमात आपले योगदान दर्शविले.


ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव, श्रीया जोगे, सुजय काळबांडे, पारस जांगडे, साक्षी मुळेकर, शुभम येरखेडे, तुषार देशमुख आदींनी परिसरात जनजागृती करीत व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. या मोहिमेत मनपाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र राठोड, विप्लब भगत यांच्यासह भोलानाथ सहारे, संजय दबळी, उपेंद्र वालदे, गुरमीत सिंग, अनिल झोडे, संदीप मानकर आदींनीही सहभाग नोंदविला.


Gokulashtami 2022 : महाराष्ट्रात 'अशी' साजरी केली जाते दहीहंडी; जाणून घ्या परंपरा


प्रत्येक पोर्णिमा दिवसानिमित्त उपक्रम


प्रत्येक पोर्णिमा दिवसानिमित्त मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्यावतीने शहरातील विविध चौकात जनजागृती अभियान राबविण्यात येते. या उपक्रमाची माहिती नागरिकांना दिल्यावर नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी सांगितले. अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या या अभियानाअंतर्गत जवळपास शहरातील प्रत्येक चौकात जनजागृती करण्यात आली आहे. याशिवाय शहरात असताना माजी आमदार ग्रीन अर्थ ऑर्गनायझेशनचे प्रा. अनिल सोले हे देखील भेट देऊन स्वयंसेवकांचा उत्साह वाढविण्याचे कार्य करत असतात. त्यांच्या सततच्या समर्थनामुळे नागरीक आणि विविध प्रतिष्ठान संचालक प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असल्याचे स्वयंसेवकांनी सांगितले.


Baba Tajuddin Urs : जगभरातून 15 लाख भाविक होणार सहभागी, बाबा ताजुद्दीन शताब्दी वर्ष उर्स 21 ऑगस्टपासून