नागपूर : भारतीय सैन्य दलामार्फत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे असून आज (ता.3) रोजी नोंदणी करण्यासाठी शेवटचा दिनांक आहे. विदर्भातील दहा जिल्ह्यांमध्ये पुरुष उमेदवारांसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत सैन्य दलाला जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती मदत केली जात आहे. सैन्य दलाच्या अग्नीवीर भरती प्रक्रियानुसार विदर्भातील नागपूर, वर्धा, वाशिम, अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, अकोला, यवतमाळ या दहा जिल्ह्यांमध्ये सैन्य दलातील काही पदांची भरती सुरू करण्यात आली आहे.
पात्रता
दहावी व आठवी पास पात्रता असणाऱ्या या पदांसाठी ऑनलाइन नोंदणी तीन ऑगस्ट (आज) पर्यंत सुरू राहणार आहे. तरुणांनी या प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी जॉईनइंडियनआर्मी डॉट एनआयसी डॉट इन (joinindianarmy.nic.in) या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. पात्र उमेदवारांना त्यांच्या ईमेल आयडीवर प्रवेश पत्र 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान मिळणार आहे. ईमेलवर प्रवेश पत्र पाठविल्यानंतर 17 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर पर्यंत भारतीय रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय सैन्य दलात सेवा करण्यास इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सैन्यदलामार्फत करण्यात आले आहे. आतापर्यंत हजारोंच्या संख्येत तरुणांनी अर्ज सादर केले आहे.
हवाई दलातील वार्षिक भरती निम्म्याहून कमी
सैन्यात अग्निपथ योजनेद्वारे नवीन भरती प्रक्रियेदरम्यान भरतीची संख्या देखील कमी होत आहे. हवाई दलातील सैनिकांची वार्षिक भरती नव्या प्रणालीमध्ये निम्म्याहून कमी झाली आहे. हवाई दलाला आधीच 10 टक्के सैनिकांची कमतरता भासत आहे. या वर्षी हवाई दलासाठी अग्निवीर म्हणून केवळ 3500 रिक्त जागा घेण्यात आल्या आहेत. जे मागील वर्षांच्या तुलनेत कमी आहे. संरक्षण मंत्रालयाने संसदेला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की, 2015 पर्यंत हवाई दलात दरवर्षी 5000 जवानांची भरती करण्यात आली होती, ज्यातून निवृत्त सैनिकांना भरपाई दिली जात होती. मात्र नंतर मुदतवाढ देण्यात आली. 2018 मध्ये 6800 भरती करण्यात आली होती, तर 2019 मध्ये ती 7200 पर्यंत वाढवण्यात आली होती आणि 2020 मध्ये 8400 भरती करण्यात आली होती. मात्र, 2020 आणि 2021 मधील भरती प्रक्रियेला कोरोनामुळे विलंब झाला. या वर्षानंतर नवीन प्रणाली लागू झाल्यामुळे जुन्या नोकरभरती रद्द करण्यात आल्या. यानंतर, सरकारने अग्निपथ योजना जाहीर केली आहे, ज्यामध्ये नवीन भरती फक्त 3500 पर्यंत कमी करण्यात आली आहे, जी पूर्वी होत असलेल्या वार्षिक भरतीच्या निम्म्यापेक्षा कमी आहे.
Pandharpur Accident : पंढरपुरात चार जणांना रेल्वेची धडक, तिघांचा मृत्यू तर एका जखमीवर उपचार सुरु
मार्चपर्यंत 6224 पदे रिक्त
हवाई दलासह सर्व सैन्यात आता सैनिकांची नवीन भरती अग्निवीरांच्या रूपात होणार आहे. मार्चपर्यंत हवाई दलात सैनिकांची 6224 पदे रिक्त होती. गेल्या दोन वर्षांत सुमारे 15,000 नियोजित भरती झाली नाही. मात्र तरीही ज्या प्रकारे भरती कमी होत आहे, त्यामुळे आगामी काळात हवाई दलातील सैनिकांच्या संख्येत मोठी कपात होणार असल्याचे मानले जात आहे. सध्या, हवाई दलाची मंजूर संख्या 143964 आहे. यामध्ये 22-23 हजार पदे रिक्त आहेत.