गुंड सय्यद मोबिन अहमदवर हत्येचा प्रयत्न, वाहन चोरीसह प्राण्यांच्या तस्करीचा आरोप आहे. तो 'चामा' ही गुंडांची गँग चालवतो. पोलिसांना तो सापडत नाही, मात्र 'टिकटॉक'वर त्याचं दर्शन सहज घडतं. तेही पोलिसांच्या गाडीतून उतरताना.
नागपुरातील कोराडी पोलिस स्टेशनसमोर उभ्या असलेल्या पोलिस व्हॅनमध्ये त्याने हा व्हिडीओ शूट केला. त्याला केजीएफ या चित्रपटाचं संगीत आणि संवाद लावून टिकटॉकवर पोस्टही केला.
VIDEO | नागपुरात विकृत प्रेमासाठी मुलीनंच आईवडिलांना संपवलं | स्पेशल रिपोर्ट | नागपूर
पोलिसांच्या नाकावर टिच्चून अगदी चित्रपटातल्या हिरोला शोभावी अशी एन्ट्री तो या व्हिडीओत करतो. त्यामुळे यात पोलीस दलातीलच काही कर्मचारी मोबिनला मदत करत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललंय काय? हा चावून चोथा झालेला प्रश्न पुन्हा विचारण्यावाचून गत्यंतर नाही.
दरम्यान, हा व्हिडिओ दीड महिन्यापूर्वीचा असल्याचं पोलिस उपायुक्त हर्ष पोद्दार यांनी सांगितलं आहे. त्यावेळी हा गुंड तडीपार नव्हता. तरी पोलिस ठाण्याच्या समोर आणि पोलिस वाहनात हा गुंड व्हिडिओ तयार करत असल्याने पोलिस कर्मचाऱ्यांचा यात दोष आहे का, हेही तपासून बघितलं जाणार आहे. या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं आश्वासन पोलिस उपायुक्तांनी दिलं आहे.
नागपुरात गुन्हेगारांचा पूर
मुख्यमंत्र्यांचं होमटाऊन असलेल्या नागपूरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याची कबुली काही वर्षांपूर्वी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली होती.
नागपूर शहर सुरक्षित बनवण्यासाठी दोन वर्षांपूर्वी नागपूर पोलिसांनी गुन्हेगारांना दत्तक घेण्याची घोषणा केली होती. या योजने अंतर्गत नागपूर पोलिसांनी शहरातील सर्व 24 पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी 20 सराईत गुन्हेगारांची यादी बनवली होती. गुन्हेगारांवर क्लोज वॉच असावा या उद्दिष्टाने ही योजना सुरु करण्यात आली होती. मात्र गुन्हेगारांवर म्हणावा तसा वचक बसत असल्याचं अजूनही दिसत नाही.