नागपूर : वाघाच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या चार जणांना नागपूर वन विभागाने अटक केली आहे. त्यांच्याकडून वाघाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. काळी जादू आणि जादूटोणा करण्यासाठी वाघाचे हे अवयव वापरले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.


रामदास चव्हाण, तारासिंग राठोड, संदीप नायक, हरीपाल नायक अशी वन विभागाने अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व महाराष्ट्र मध्यप्रदेश सीमेवरील पेंच व्याघ्र प्रकल्पात राहतात. रामटेक येथील राम मंदिराजवळ काहीजण वाघाचे अवयव घेऊन येत असल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर सापळा रचून वन विभागाने तीन आरोपींना ताब्यात घेतले.



त्यांच्याजवळच्या दुचाकीमधून वनविभागाला वाघाच्या मिशीचे केस मिळून आले. ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर वाघाचे अवयव पेंच राष्ट्रीय उद्यानातील जंगलात पुरून ठेवल्याची माहिती त्यांनी दिली. माहितीच्या आधारे वन विभाग त्यांना घेऊन पेंचच्या जंगलात गेले. आरोपींनी सांगितलेल्या जागी खोदकाम केल्यावर त्या ठिकाणाहून जमिनीत पुरून ठेवलेल्या वाघाच्या हाडांसह इतर अवयव जप्त केले. शिवाय या ठिकाणाहून देखील एका आरोपीस अटक केली.

जादूटोण्यासाठी या अवयवांचा वापर करीत असल्याची माहिती पुढे आली आहे. जमिनीतून बाहेर काढण्यात आलेले अवशेष हे वाघाचेच आहेत का ? हा वाघ कोण होता? नर कि मादी? कधी आणि कसा मृत्यू झाला? या बद्दल संपूर्ण माहिती फोरेन्सिक अहवालानंतर पुढे येणार आहे.