Nagpur News : राज्यात महापुरुष आणि संतांचे अपमान करणाऱ्यांवर कारवाई होत नसून राज्य सरकारने याबद्दल मौन बाळगल्याचा आरोप करत एका महिलेने नागपूर विधिमंडळाच्या गेटवर अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षारक्षकांना वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. संतांचा अपमान झाल्यामुळे यावर सरकार काही कारवाई करत नाही. यामुळे महिलेने आत्मदहनाचा प्रयत्न  केला असल्याचे सांगितले जात आहे.


तुम्ही शिवाजी महाराजांच्या नावावर राजकारण करता... वारकरी संप्रदायाचा अपमान करता... तुमच्या अधिवेशनात पोलिसांना जेवण मिळत नाही.. तुमच्याकडे कुठलेच मुद्दे शिल्लक नाही... शिवाजी महाराज की जय.. बाबासाहेब आंबेडकर की जय... अशा घोषणा देत अचानकच या महिलेने विधानभवनाच्या मुख्य दारासमोर अंगावर रॉकेल ओतून घेतलं. तिथल्या सुरक्षारक्षकांनी तिला वेळीच थांबवले आणि पुढील अनर्थ टळला. सध्या नागपूर पोलिसांनी या तरुणीला ताब्यात घेतले असून तिला नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले आहे. महिला सोलापूर येथील असून तिचे नाव कविता चव्हाण असल्याची माहिती आहे.


या आंदोलनकर्त्या महिलेच्या समर्थकांनी दिलेल्या निवेदनानुसार, आपल्या पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांना बदनाम करणे, त्यांच्याबद्दल खालच्या पातळीचे वक्तव्य करणे हे नित्याचे झाले आहे. अशा प्रकाराने सामान्य जनमानसाची मने दुखावली जातं आहेत. आजकाल ज्यांची लायकी नाही, अशी लोकही त्यांच्या मनाला वाटेल त्या हिन पातळीचे वक्तव्य करु महापुरुषांबद्दल अपशब्द बोलत आहेत. याचा आम्ही निषेध करतो. असे बेताल वक्तव्य करणाऱ्या लोकांच्या विरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे निवेदनात म्हटले आहे.


महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कायदे करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणीही अशा प्रकाराचे कृत्य करणार नाही. त्यामुळे जनसामान्यांच्या मनातील खदखद ओळखुन योग्य ती उपाययोजना करण्यात यावी. या अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिस बांधवांना दोन दिवस जेवणं उपलब्ध झाले नाही. ही अत्यंत दुःखद बाब आहे. जर रक्षणकर्त्यांच्या पोटाचा प्रश्न उपस्थित होत असेल तर यापेक्षा शरमेची दुसरी गोष्ट असू शकत नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.


अधिवेशनातही घोषणा...


राज्यभरात महापुरुषांचे अपमान करण्याची स्पर्धाच सुरु असून यावर राज्य सरकार बोलायला तयार नसल्याचे आरोप करत अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. तसेच दररोज राज्यपाल हटाओ, महाराष्ट्र बचाओ आदी घोषणांनी विधानभवन परिसर दणाणून गेला होता.


ही बातमी देखील वाचा...


हिवाळी अधिवेशनावर शंभर कोटींचे खर्च, तरी हे काय? खानपानाच्या व्यवस्थेवरुन अजित पवार संतापले