नागपूरः महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेच्या निवडणुकीसाठी जाहीर वेळापत्रकानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता, मात्र क्षुल्लक चुकांमुळे तो नामंजूर झाला. निवडणूक अधिकाऱ्याच्या या निर्णयाला आव्हान देत उमेदवार मारुती शिंदे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. याचिकेवर बुधवारी सुनावणीनंतर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर आणि उर्मिला फाळके यांनी निवडणूक अधिकाऱ्याचा निर्णय रद्द करून याचिकाकर्त्याला उमेदवारी अर्जात पत्रात दुरुस्ती करण्याची संधी देण्याचे आदेश दिले. सोबतच न्यायालयाने उमेदवारी अर्ज छाननीच्या तारखेपासून निवडणूक कार्यक्रमात बदल करण्याचे स्वातंत्र्य देखील प्रदान केले. विशेष म्हणजे या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन हायकोर्टाने एक दिवस आधीच असोसिएशनची तदर्थ समिती आणि निवडणूक अधिकाऱ्याला नोटीस बजावली आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी सुनावणी घेऊन निर्णय सुनावला.


अनुमोदक-सूचकाचा अनुक्रमांक लिहिला नव्हता


याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले की असोसिएशनच्या तदर्थ समितीकडून 11 जुलै 2022 रोजी असोसिएशनची निवडणूक असल्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार 22 जुलैपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार होते आणि 23 जुलै पासून त्यांची छाननी होणार होती. छाननीनंतर उमेदवारी अर्जात अनुमोदकाचा आणि सूचकाचा अनुक्रमांक नसल्याचे कारण देत याचिकाकर्त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. नियमानुसार उमेदवारी अर्जात अनुमोदक आणि सूचकाचा अनुक्रमांक देणे आवश्यक होते. सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या वतीने सांगण्यात आले की, असोसिएशनच्या मतदाता यादीत अनुमोदक आणि सूचकाचा अनुक्रमांक आहे, मात्र तो लिहायचे विसरल्यामुळे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला.


चूक सुधारता येते


दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आदेशात म्हटले, उमेदवारी अर्जात त्रुट्या असल्यावरून निवडणूक अधिकाऱ्याने ते रद्द करणे तर्कसंगत आहे, मात्र जर चूक सुधारण्या योग्य आहे तर संबंधिताला ती दुरुस्त करण्याची संधी मिळाली पाहिजे. सुनावणी दरम्यान न्यायालयाला सांगण्यात आले की, क्षुल्लक चुकीसाठी इतरांचाही उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला आहे. जर याचिकाकर्त्याला उमेदवारी अर्जात दुरुस्तीची संधी मिळाली तर इतरांनाही क्षुल्लक दुरुस्ती करण्याची संधी द्यावी लागेल. सुनावणीनंतर न्यायालयाने दोन्ही उमेदवारी अर्जात दुरुस्तीची संधी देण्याचे स्वातंत्र्य निवडणूक अधिकाऱ्याला दिले.


Nagpur Crime : कर्जात बुडाल्याने केला लुटण्याचा बनाव , नोकरच निघाला चोर