Nagpur Grampanchayat Election : मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत नुकतीच प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मतदारांना दावे, हरकती नोंदवण्यासाठी 8 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
आठ डिसेंबरपर्यंत नोंदवण्यात आलेल्या दावे आणि हरकती 26 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेनंतर 3 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम मतदार यादी प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोगाची परवानही मागण्यात येणार असून 5 जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यंनी दिली. तसेच आज जिल्ह्यात सकाळपासून नागपूर जिल्ह्यातील 569 ग्रामपंचातींमध्ये विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये प्रारुप मतदार यादीचे वाचन करण्यात येत आहे. तसेच दावे आणि हरकतींची नोंदही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी डॉ. इटनकर बोलत होते. मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती 26 डिसेंबरपर्यंत निकाली काढण्यात येणार आहेत. 3 जानेवारी 2023 पर्यंत अंतिम प्रसिद्धीसाठी निवडणूक आयोगाची परवानगी मागण्यात येणार आहे. डाटाबेस अद्ययावत करणे तसेच पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. अंतिम यादी पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ही प्रारुप मतदार यादी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना देण्यात आली. प्रारूप यादी तपासून घ्यावी. काही आक्षेप असतील त्यानुसार फॅार्म 7 व 8 सादर करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना यावेळी केले.
शिक्षक मतदार संघ नोंदणीसाठी 11 हजारांवर अर्ज
दरम्यान, नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात मतदार नोंदणीकरता 7 नोव्हेंबरपर्यंत 11 हजार 3 अर्ज प्राप्त झाले आहेत. या निवडणुकीसाठी 43 मतदार केंद्र असणार आहेत. प्रारुप मतदार यादी 23 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दावे आणि हरकती 23 नोव्हेंबर ते 8 डिसेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 30 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचीही माहिती यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
237 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; 18 डिसेंबरला होणार मतदान
नागपूर जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 237 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रमही बुधवारी जाहीर करण्यात आला. या ग्रामपंचायतींसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील 10, कळमेश्वर 23, कामठी 27, काटोल 27, कुही 4, मौदा 24, नागपूर (ग्रामीण) 19, नरखेड 22, पारशिवनी 22, रामटेक 8, सावनेर 36, उमरेड 7, हिंगणा 7 तसेच मौदा तालुक्यातील एका ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती, नव्याने स्थापित ग्रामपंचायती तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसल्यामुळे मागील निवडणुकांमधून वगळलेल्या ग्रामपंचायतींच्या (सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या) सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यासह राज्यातील 340 तालुक्यातील 7751 ग्रामपंचायतीसाठी सदस्य पदासह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे.
हेही वाचा