Sajay Raut At Matoshree: तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर आज शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) 'मातोश्री'वर ठाकरे कुटुंबीयांच्या (Uddhav Thackeray) भेटीसाठी दाखल झाले. संजय राऊत यांच्या स्वागतासाठी शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे स्वत: उपस्थित होते. संजय राऊत मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी त्यांचे कडकडून मिठी मारत स्वागत केले. मातोश्रीच्या प्रवेशद्वारावर कदाचित पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील सदस्याने आपल्या पक्षातील नेत्याचे स्वागत केले असावे. 


बुधवारी, संजय राऊत यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोषात स्वागत करण्यात आले होते. आर्थर रोड तुरुंग ते राऊत यांच्या निवसास्थानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर भांडूप येथील घराजवळ शिवसैनिकांना संबोधित करताना आपण मरेपर्यंत शिवसेनेत राहणार असल्याचे राऊत यांनी म्हटले होते. तुरुंगातून सुटल्यानंतर संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर दाखल होतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, राऊत हे गुरुवारी सकाळी मातोश्रीवर जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर ठाकरे कुटुंबीय हे राऊत कुटुंबीयांच्या पाठिशी उभे राहिले होते. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या मातोश्री आणि कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली होती. नवरात्रौत्सवात ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी जातानादेखील रश्मी ठाकरे यांनी राऊत कुटुंबीयांची भेट घेतली होती. 


जे डरपोक होते ते पळून गेले: आदित्य ठाकरे


संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर आदित्य ठाकरे यांना बुधवारी प्रतिक्रिया व्यक्त करताना आनंद व्यक्त केला होता. आदित्य ठाकरे यांनी म्हटले की, संजय राऊत निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच, बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक आहेत. उगाचच नाव लावून फिरत नाहीत, मुखवटे लावून फिरत नाहीत. त्यांच्यावरही दबावतंत्र वापरलं पण त्यांनी गद्दारी केली नाही असेही आदित्य यांनी म्हटले. संजय राऊत हे पळून गेले नाहीत. ते डरपोक नाहीत हे लोकांसमोर आलं आहे. जे डरपोक होते ते पळून गेले. मी आता तेच सांगितलं जे कोणी सत्तेविरोधात आवाज उठवतात, सरकारविरोधात बोललं की दबावतंत्र वापरलं जातं. आज राजकीय लोकांवर कारवाई होते, उद्या ज्यांना ते एचएमव्ही बोलतात त्यांच्यावरही कारवाई होईल ही देशासाठी धोक्याची घंटा असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.