EM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. या समृद्धी महामार्गाचा आढावा घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'टेस्ट राईड'वर निघाले आहे. नागपूरहून हा ताफा शिर्डीच्या दिशेने रवाना झाला असून एकाच कारमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. विशेष म्हणजे कारचे 'स्टेअरिंग' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हाती आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर असणार आहेत. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यापूर्वी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर ते शिर्डी पर्यंत महामार्गाची पाहणी करत आहेत. टेस्ट राईडवर निघण्यापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समृद्धी मार्गाच्या नागपूरकडील झिरो माईल्स (महामार्गाचे सुरुवातीचे ठिकाण) येथून ते प्रवासाला सुरुवात केली. नागपूर ते शिर्डी पर्यंतचा 521 किमीचा प्रवास ते पूर्ण करणार आहेत. नियोजित दौऱ्यानुसार आज सायंकाळी पाच वाजता ते शिर्डी येथे पोहोचतील. त्यानंतर शिर्डी विमानतळावरून मुख्यमंत्री नवी दिल्लीकडे प्रयाण करणार आहे. सध्या हा ताफा वर्धाच्या पुढे असून समृद्धी महामार्ग जाणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे, ही खूप अभिमानाची बाब आहे. तसेच महामार्गाचे लोकार्पण करण्याचा सौभाग्य आम्हाला मिळाला आहे याचा आम्हाला आनंद आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, समृद्धी महामार्ग विदर्भाच्या विकासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या महामार्गाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी पाहणी केली आहे. त्यामुळे यावेळी मी टेस्ट राईडचा आनंद घेतोय.
11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गासह नागपूर मेट्रोच्या रीच 2 आणि रीच 3 या मार्गिकेचेही उद्घाटन करणार आहे. त्याचाही आढावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल घेतला होता. पंतप्रधानाच्या दौऱ्यामुळे सुरक्षा यंत्रणेनेकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
ही बातमी देखील वाचा