Teachers Constituency Elections Nagpur : एरव्ही शाळेत उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा देणारे शिक्षकच नागपूर विभागात होत असलेल्या मतदानाला उशिरा पोहोचल्याचं दिसून आलं. त्यामुळे शेवटच्या तासात शिक्षकांची चांगलीच धावाधाव झाली. मात्र वेळेनंतर मतदान केंद्रावर येणाऱ्या लेटलतिफ शिक्षकांना मतदानाला मुकावं लागलं असल्याचं चित्र अनेक मतदान केंद्रावर दिसून आलं.
नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात विधानपरिषदेच्या शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. यामध्ये गडचिरोली वगळता उर्वरित जिल्ह्यात दुपारी 4 पर्यंत मतदानाची वेळ देण्यात आली होती. मात्र अनेक शिक्षकांनी साडेतीननंतर मतदान केंद्र गाठले, तर काही लेट लतिफ शिक्षक चार वाजल्यानंतरही मतदान केंद्रावर पोहोचले. ही निवडणूक बॅलेट पेपरनुसार घेण्यात आली. तसेच पसंती क्रमांकानुसार मतदान करण्याची पद्धत असल्याने नेहमीप्रमाणे प्रत्येक मतदाराला इतर निवडणुकींच्या तुलनेत जास्त वेळ लागत होता. त्यामुळे दुपारी चारनंतरही विभागातील अनेक मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या.
नागपूर विभागाअंतर्गत नागपूरसह गडचिरोली, भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यातील 39 हजारांवर शिक्षक मतदार आहेत. तर 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये गडचिरोली येथे सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली होती. तर उर्वरित जिल्ह्यांत सकाळी आठ वाजता मतदान सुरु झाले. निवडणूक विभागाने दुपारी दोनपर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 60.48 टक्के मतदान झाले होते. मात्र दुपारी चारपर्यंत मतदानाची वेळ असल्याने अनेक शिक्षक तीन वाजल्यानंतर केंद्रांवर दाखल झाले. तसेच काही लेटलतिफांनी 4 नंतरही मतदान केंद्र गाठले. मात्र 4 नंतर आलेल्या अनेकांना मतदानाची संधी देण्यात आली नसल्याची माहिती आहे. मतदान केंद्रांवर चारपर्यंत आलेल्या सर्वांना आतमध्ये घेऊन मतदान केंद्राचे मुख्यद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे अनेकांचे मतदान हुकले असल्याची चर्चा होती.
नागपुरातील नागसेन विद्यालयात मतदानासाठीची दुपारी चार वाजताची वेळ संपल्यानतरही 250 ते 300 मतदार रांगेत उभे होते. तर न्यू इंग्लिश शाळा मतदान केंद्रावर दुपारी चारच्या पूर्वी आलेत त्यांना आता घेतलं आहे. त्यांचं मतदान झालं असून दुपारी चार नंतर आलेत त्यांना आत घेतलं नसल्याची माहिती आहे. तर माऊंट कारमेल शाळेतही चारनंतर मतदारांच्या रांगा बघायला मिळाल्या.
प्रत्येक केंद्रांत मार्गदर्शक सूचनांचे फलक
मतदानाला सकाळी आठ वाजताचा सुरुवात झाल्यानंतर शिक्षक मतदार यायला सुरुवात झाली. मतदान कसे करावे, उमदेवारांची माहिती मतदान केंद्रांबाहेर दर्शनी भागात लावण्यात आली होती. प्रत्येक मतदान केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त पहायला मिळाला. निवडणुकीत 22 उमेदवार आपले नशीब आजमावणार आहे.
मतदारांचा उत्साह शिगेला
मतदानासाठी शिक्षकांचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचे आज पहायला मिळाले. नागपूर विभागातील एकूण सहा जिल्ह्यांमध्ये 124 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. यात नागपूर जिल्ह्यातील 43 मतदान केंद्रांवर मतदान होत असून 16 हजार 480 शिक्षक मतदानाचा हक्क बजावणार होते. सकाळी आठ वाजेपासून जिल्ह्यातील सर्वच मतदान केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. मतदान शांततेत सुरू असल्याचे पहायला मिळाले. यात सिव्हिल लाईन्स येथील तहसील कार्यालय (ग्रामीण), म. न. पा. हिंदी प्राथमिक शाळा गांधीनगर आणि हिंगणा येथील पंचायत समिती कार्यालयातील मतदान केंद्रांवर मतदारांची सकाळी गर्दी झालेली पहायला मिळाली. शिक्षक मतदारांचा उत्साह मतदानासाठी दिसून आला.
ही बातमी देखील वाचा...