Chandrashekhar Bawankule on Satyajit Tambe : राज्यभरात झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत नाशिक पदवीधर निवडणूक सत्यजीत तांबे यांच्या अपक्ष उमेदवारीवरुन चांगलीच गाजली. बंडखोरी केल्यानंतर काँग्रेसने सत्यजीत तांबे आणि सुधीर तांबे यांचं निलंबन केलं आहे. या निलंबनानंतर सत्यजीत तांबे यांनी आमच्याशी संपर्क साधला तर नक्कीच हायकमांडशी बोलू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती. यानंतर पुन्हा त्यांनी सत्यजीत तांबेंवर भाष्य केले असून सत्यजित तांबे पूर्ण मानसिकतेने आमच्याकडे आले, तर त्यांचे स्वागतच आहे, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, 'सत्यजीत तांबे पूर्ण मानसिकतेने आमच्याकडे आले, तर त्यांचे स्वागतच आहे. सत्यजीत तांबे आले तर आम्ही तर कधीही तयार आहोत. पक्षात अनेक लोक आले आहे, मग सत्यजित तांबे आले, तर काही अडचण नाही. ते आले तर आम्ही स्वागतच करू. आम्ही कितीही प्रस्ताव दिले किंवा कोणी काहीही म्हटलं, तरी जोवर ते संपूर्ण मानसिकतेने पक्षात येत नाही. तोपर्यंत आम्ही काय करू शकतो. हा निर्णय सत्यजित तांबे यांनाच घ्यायचा आहे.'
आता झालेल्या विधानपरिषदेच्या या जागांवर यापूर्वी निवडणुकीत जे निकाल आले, त्यापेक्षा हे निकाल चांगले असतील. सहा वर्षांपूर्वीच्या निकालात आणि या निकालात भाजप आणि युतीला जास्त यश मिळालेलं असेल. चार जागा आम्ही लढवल्या होत्या, नागपूरच्या जागेवर आम्ही समर्थन दिलं होतं आणि सत्यजित तांबे यांना स्थानिक भाजपनं समर्थन दिलं होतं. स्थानिक स्तरावर सत्यजीत तांबे यांना भाजपने मदत केली असल्याचा खुलासाही यावेळी बावनकुळे यांनी केला आहे.
प्रकाश आंबेडकर यांचं वक्तव्य मानसिक दिवाळखोरीचं लक्षण
प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेलं वक्तव्य विक्षिप्तपणाने केलंय. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. प्रकाश आंबेडकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्याबाबत बोलले हे मानसिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. आमच्या नेतृत्त्वावर टीका टिप्पणी केली, तर राज्यभर प्रकाश आंबेडकर यांचा निषेध व्यक्त करावा लागेल. अशा वक्तव्यामुळे जो असंतोष निर्माण झाला महाराष्ट्रात याचा उद्रेक होईल, अशा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे.
मतदानानंतर काय म्हणाले होते सत्यजीत तांबे?
तर मतदानानंतर माध्यमांशी बोलताना सत्यजीत तांबे म्हणाले, 'देशभरात मी काँग्रेस पक्षासाठी काम केलं, गेल्या 22 वर्षांपासून संघटनेसाठी माझं काम आहे. काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे. पक्षांतर्गत प्रक्रिया आणि शिस्तपालन समितीचे नियम आहेत. सर्व नियमांची पायामल्ली केली गेली आहे. माझ्याकडे खुलासा न मागता माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे.'
महत्त्वाच्या इतर बातम्या :