नागपूर : बुधवार 31 ऑगस्टपासून सुरू होत असलेला गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) नागपूर शहरात पर्यावरणपूरकरित्या साजरा व्हावा यासाठी नागपूर महानगरपालिका (NMC) प्रशासनाद्वारे आवश्यक ते सर्व कार्य करण्यात येत आहेत. या अंतर्गत गणेश मंडळ आणि घरगुती गणपतींचे निर्माल्य संकलन करण्यासाठी मनपाद्वारे 'निर्माल्य रथ'ची व्यवस्था करण्यात आली आहे. मनपाच्या दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक रथाची व्यवस्था करण्यात आली आहे. या रथांचा झोननिहाय स्थापन करण्यात आलेल्या गणेश मंडळांनुसार रुटही ठरविण्यात येणार असून त्यामुळे गणेश मंडळांनाही सोयीचे होणार आहे. आज, मंगळवारी मनपा मुख्यालयातील (NMC Headquarter) प्रशासकीय इमारत परिसरात मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर (Collector Vipin Itankar) यांनी हिरवी झेंडी दाखवून निर्माल्य रथाचे लोकार्पण केले.
एजी एन्व्हायरो आणि बीव्हीजी या दोन्ही कंपन्यांनी निर्माल्य रथाद्वारे निर्माल्य संकलनाची जबाबदारी स्वीकारली आहे. यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून संकलित करण्यात आलेल्या निर्माल्यापासून खत निर्मिती केली जाणार आहे. बुधवार 31 ऑगस्टपासून शहरातील विविध भागात झोननिहाय निर्धारित निर्माल्य संकलन वाहन फिरणार असून त्याद्वारे प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातून निर्माल्य संकलन केले जाईल. निर्माल्य रथ लोकार्पणप्रसंगी मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे नागरिकांना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करता आला नाही. यंदा कुठलेही निर्बंध नसल्याने, लोकांमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे मनपा प्रशासनानेही गणेशोत्सवात लोकांना पुरेशा सेवा पुरविण्यावर अधिक भर दिला आहे. नागपूरकरांनी सार्वजनिक गणेश मंडळ आणि घरगुती गणपतीचेही निर्माल्य पर्यावरण संवर्धनांच्या दृष्टीने, मनपा निर्माल्य रथात जमा करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
निर्माल्य संकलन बॅगमध्ये होणार निर्माल्य संकलीत
झोननिहाय दहा या निर्माल्य रथामध्ये, प्रत्येकी दहा निर्माल्य संकलन बॅग ठेवण्यात आल्या आहेत. एका बॅगमध्ये सुमारे चारशे किलो निर्माल्य संकलीत करण्याची क्षमता आहे. बॅगमध्ये निर्माल्य संकलित करून ते निर्माल्य रथामार्फत पुढील प्रक्रियेसाठी नेले जाणार आहे. नागरिकांनी आपल्या घरगुती गणपतीचे संकलीत केलेले निर्माल्य, आपल्या परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळात आणून द्यावे, ते सर्व संकलीत केलेले निर्माल्य मनपाचे निर्माल्य रथ रोज संकलीत करणार आहेत.सर्व मंडळांनी निर्माल्य संकलन कार्यात सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी केले.
दहा झोनमध्ये दिवसभर फिरणार निर्माल्यरथ
शहरातील, लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली, नेहरूनगर, गांधीबाग, सतरंजीपुरा, लकडगंज, आशीनगर, मंगळवारी या दहाही झोनमध्ये दिवसभर निर्माल्य रथ फिरणार आहेत. रोज संकलीत केलेले निर्माल्य त्याच दिवशी कंपोस्टींगसाठी भांडेवाडी प्रकल्पात सोडले जाणार आहे. याशिवाय, कृत्रिम तलाव परिसरात उभारलेले निर्माल्य कलशामध्ये जमा होणारे निर्माल्यही निर्माल्य रथातून संकलीत केले जाईल, अशी माहिती, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
निर्माल्यापासून खत निर्मिती
2019 मधील गणेशोत्सवात, नागपूर महानगरपालिकेने शहरातून, सुमारे 150 मॅट्रीक्स टन निर्माल्य संकलीत केले होते. यंदा सुमारे तीनशे मेट्रीक टन निर्माल्य संकलीत होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवातील निर्माल्याचे धार्मिक महत्व लक्षात घेता, हे निर्माल्य नेहमीच्या कऱ्यासोबत न टाकता, जमा झालेल्या निर्माल्य भांडेवाडी येथील कंपोस्टींग प्लॅंटमध्ये स्वतंत्र्यरित्या संकलीत करून, त्यावर प्रक्रीया करून खत निर्मीती करण्यात येणार आहे. निर्माल्यापासून तयार झालेल्या या खताचा वापर मनपाच्या सर्व सार्वजनिक उद्यानात केला जाईल, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त (Department of Solid Waste Management) तथा संचालक डॉ. गजेंद्र महल्ले यांनी दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या