नागपूर : आधी युतीची रेसिपी सांगा, मगच भोजनाला येऊ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या भोजनाच्या आमंत्रणावर  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं उत्तर युतीची खिचडी अजूनही का शिजत नाही, याचं कारण स्पष्ट करणारं आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, आधी पंतप्रधान मोदींनी उद्धव ठाकरेंना दिल्लीतल्या निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आमंत्रणाच्या बदल्यात मोदींनाच मातोश्रीवर भोजनाचे निमंत्रण दिले.


युती पक्की होत नाही, तोपर्यंत डिनर डिप्लोमसी ही राजकीय डिप्लोमसी ठरणार नाही. म्हणूनच मोदी मुंबईला येऊ शकतात आणि हे दोघेही नेते राजभवनात जेवायला भेटू शकतात, असाही एक मार्ग काढल्याचे समजते. अर्थात उद्धव ठाकरेंनी राजभवनातल्या आमंत्रणाचा स्वीकार केलेला नाही, त्याचं कारण कायम असलेला युतीचा तिढा.

खरं तर युती व्हावी आणि होऊ नये असे दोन गट शिवसेनेत आहे. युतीच्या बाजूने एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, सुभाष देसाई
आणि अनिल देसाई आहेत. तर युतीच्या विरोधात संजय राऊत, दिवाकर रावते आणि रामदास कदम आहेत. अर्थात निर्णय उद्धव ठाकरेच घेणार आहेत. पण या दोन मतप्रवाहांमुळेच युतीची चर्चा अडल्याचं कळतंय.

शिवसेनेत अशीही मंडळी आहेत, ज्यांना युतीच्या निर्णयाला तसाही खूप उशीर झाला असल्याचं वाटतं. त्यात युती झाली नाही तर पाच वर्ष सरकारमध्ये राहिल्यावर जनतेत नक्की काय भूमिका घेऊन जायची, यशाची की अपयशाची, हे ठरवणे सेनेसाठी ही सोपे असणार नाही हे नक्की.