नागपूर : लहान मुलं काय खातात, ते कोणत्या वस्तू तोंडात घालतात, याकडे पालकांनी डोळ्यात तेल घालून काळजी घेण्याची गरज आहे. कारण नागपुरात नुकत्याच घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन चिमुकल्याना जीव गमवावा लागला आहे. विश्वास बसणार नाही, अशा कारणांमुळे या लहानग्यांचे जीव गेले आहेत. फुग्याची टिचकुली एका मुलाच्या जिवावर उठली तर केळ्याचा घास मुलीसाठी जीवघेणा बनला.


फुगा श्वासनलिकेत अडकला

सानिध्य उरकुडे हा सहा वर्षीय मुलगा घराच्या आवारात फुग्यांनी खेळत होता. 25 जानेवारीला त्याने तीन फुगे खरेदी केली. दोन फुगे आईने फुगवून दिले. तर संध्याकाळी तिसरा फुगा फुगवण्याचा प्रयत्न केला. पण तो फुटलेला असल्याने त्याने फुग्यापासून छोटा फुगा बनवणं सुरु केलं. त्याच प्रयत्नात, जोरात श्वास घेतल्याने तो फुगा त्याच्या तोंडातून घशात गेला आणि श्वासनलिकेत अडकला. त्रास झाल्याने चिमुकल्या सानिध्यने घरात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. लहानपणी आपण सर्वांनीच हे असले प्रकार केले आहेत. पण ते किती जीवघेणे ठरु शकतात, हे या घटनेवरुन दिसतं.

केळ्याचा घास जीवघेणा ठरला

दुसरी घटनाही नागपुरातलीच आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर-भंडारा रोडवर पारडी परिसरात घडली. अडीच वर्षांची तिथी मिश्रा नेहमीप्रमाणे शेजारच्यांच्या घरी खेळायला गेली. घरात पूजा झाल्यावर त्यांनी प्रसादाचं केळं कुटुंबातील मुलांना आणि तिथीला खायला दिली. मात्र, केळ्याच्या आकाराचा आणि स्वतःच्या क्षमतेचा अंदाज न आल्यामुळे तिथीने ते केळं आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं. पण केळ्याचा तो घास तिच्या श्वासनलिकेत अडकला. तिथीचा त्रास पाहून शेजाऱ्यांनी तिच्या तोंडातून केळं काढण्याचा प्रयत्न केला. ते शक्य न झाल्याने त्यांनी तिथीच्या आई-वडिलांना याबाबत कळवलं. मात्र तोपर्यंत चिमुकल्या तिथीचा जीव गेला होता.

या अनाकलनीय...अकल्पित...आणि अनपेक्षित घटनांनी या दोन्ही कुटुंबाची रयाच गेली आहे. दोन्ही कुटुंबांनी आपले काळजाचे तुकडे गमावले आहे. या बातमीने तुमच्या घरातल्या चिमुकल्यांबद्दलची तुमची काळजीही वाढली असेल याची कल्पना आहे. त्यामुळे तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सतर्क करण्याचा हा प्रयत्न आहे.