नागपूर : राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. त्यातच आता गेल्या कित्येक वर्षांपासून वेगळ्या विदर्भ राज्याच्या  (Separate Vidarbha) मागणीने आता अधिक जोर धरला आहे. उपराजधानी नागपूरसह (Nagpur) विदर्भातील अनेक भागत विदर्भवाद्यांचा एल्गार पुकारत आंदोलन केले जात असल्याचे चित्र आहे. त्याचं पार्श्वभूमीवर वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसह विदर्भातील अनेक प्रकल्पांना होत असलेल्या दिरंगाई संदर्भात नागपूरात (Nagpur) माजी आमदार वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवादी गेले चार दिवस उपोषण करत आहेत. या उपोषण दरम्यान चार उपोषणकर्त्यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चार दिवस आंदोलन करत असतांना देखील सरकारने अजूनही आमच्या आंदोलनाची दखल घेतलेली नाही, असा विदर्भवाद्यांचा आरोप आहे. 31 डिसेंबर पर्यंत उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करू.  मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून गनिमीकावा केला जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी सरकारला दिला आहे. 


 31 डिसेंबर पर्यंत सरकारला अल्टीमेटम


मुबलक नैसर्गिक साधन सुविधां असूनही केवळ राज्यकर्त्यांच्या स्वार्थापोटी विदर्भाची वाताहत सुरू आहे. शेतकरी आत्महत्या, कुपोषण, बेरोजगारी, नक्षलवादामुळे विदर्भ ओसाड झाला आहे. त्यामुळे स्वतंत्र राज्य मिळावे म्हणून गेल्या बुधवार, 27 डिसेंबरपासून नागपूरच्या संविधान चौक तसेच बुलडाणा येथे आमरण उपोषण केले जात आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात काही विदर्भवाद्यांची प्रकृती खालावली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वयोवृद्ध विदर्भवादी कार्यकर्ते गेले चार दिवस आंदोलन करत असतांना सरकारने अजूनही आमच्या आंदोलनाची साधी दखल घेतलेली नाही. त्यामुळे विदर्भावाद्यांच्या मनात सरकार विरुद्ध रोष असल्याचे बघायला मिळत आहे. संविधानिक पद्धतीने आम्ही शांततेच्या मार्गाने हे उपोषणाचे शस्त्र हाती घेतले आहे. 31 डिसेंबर पर्यंत आम्ही उपोषणाच्या माध्यमातून शांततेने आंदोलन करू. तोपर्यंत सरकारला अल्टीमेटम आहे. मात्र, त्यानंतर कार्यकर्त्यांशी सल्लामसलत करून गनिमीकावा करत मोठे पाऊल उचलले जाईल, असा इशारा विदर्भवाद्यांनी दिला आहे.


मागणीला गावागावांतून नागरिकांचे समर्थन


वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी ही गेल्या 118 वर्षांपासूनची आहे. मिशन 2023 च्या अंतिम टप्प्यातील हे आमचे आंदोलन असून 31 डिसेंबर पर्यंत आम्ही उपोषणाचे हत्यार वापरले आहे. विदर्भाला सुजलाम् सुफलाम् बनवायचे असेल, तर येत्या  31 डिसेंबरपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करा अशी, अशी मागणी आम्ही केली आहे. या मागणीच्या पूर्ततेसाठी आम्ही नागपूरच्या संविधान चौकात गेल्या  27 डिसेंबरपासून आमरण उपोषण करत आहोत.  या आंदोलनाला विदर्भातील गावागावांतून नागरिकांचे समर्थन मिळत आहे. हे आंदोलन आता मागे घेतले जाणार नाही. शेंडी तुटो की पारंबी, अशी आमची भूमीका असल्याची  प्रतिक्रिया  माजी आमदार आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी दिली. 


 या आहेत प्रमुख मागण्या


1) केंद्र सरकाने विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करावे
2) विजेची दरवाढ राज्य सरकारने तात्काळ मागे घ्यावी आणि शेतीपंपाला दिवसाचे लोडशेडींग बंद करावे.
3) विदर्भात येऊ घातलेले दोन्ही औष्णिक वीज प्रकल्प विदर्भाबाहेर न्यावे.
4) वैधानिक विकास मंडळ नको, विदर्भ राज्यच हवे.
5) अन्नधान्यावरील G.S.T. तात्काळ रद्द करावा
6) आष्टी ते आलापल्ली-सुरजागढ हा रस्ता सिमेंट कॉक्रीट मध्ये बांधण्यात यावा.
7) बल्लारपुर-सुरजागढ रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
8) खामगांव-जालना रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
9) बडनेरा-कारंजा-मंगरुळपीर-वाशिम रेल्वेमार्गास केंद्र सरकारने तात्काळ मंजुरी प्रदान करुन निधी उपलब्ध करुन द्यावा.
10) आर्वी-पुलगांव (शकुंतला) रेल्वेचे ब्रॉडगेज मध्ये तात्काळ रुपांतर करण्यात यावे.