नागपूर : महाराष्ट्रात सावनेर विधानसभा (Savner assembly constituency) मतदारसंघाच्या निमित्ताने पोटनिवडणूक होईल का? हा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चांगलाच फिरू लागलाय. त्यातही पुणे (Pune) आणि चंद्रपूर (Chandrapur) लोकसभा पोटनिवडणुकांचा प्रश्न प्रलंबित असताना नागपुरातील (Nagpur) सावनेर मतदारसंघाच्या निवडणुका होणार असल्याच्या चर्चा सध्या रंगू लागल्या आहेत. कारण काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) बँक घोटाळ्यात दोष सिद्ध झाल्यामुळे त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यामुळे पुणे आणि चंद्रपूरच्या आधी सावनेरचा प्रश्न मार्गी लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 


दरम्यान राजकीय विश्लेषकांना वाटतंय की विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या राजकीय नफा तोट्याचा अंदाज घेऊन पोट निवडणूक घेतली जाऊ शकते. त्यामुळे पुणे आणि चंद्रपूरची नाही झाली तरी सावनेरची निवडणूक होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. 


सुनील केदार दोषी


 तब्बल 22 वर्षे चाललेल्या बँक घोटाळ्याच्या प्रकरणात सुनील केदार दोष सिद्ध झालेत.त्यांना विविध कलमान्वये वेगवेगळ्या कालावधीची शिक्षा सुनावण्यात आलीये. पण त्यांना त्यांच्या सर्व शिक्षा या एकत्रच भोगायच्या आहेत, तसेच त्यांची सर्वाधिक शिक्षा ही पाच वर्षांची आहे. त्यामुळे केदार यांना पाच वर्ष तुरुंगात राहावे लागण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येतेय. दरम्यान, शिक्षा होताच तब्येत बिघडल्यामुळे केदारांनी 22 डिसेंबरच्या रात्रीपासून 28 डिसेंबरच्या रात्रीपर्यंत रुग्णालयातील वास्तव्याच्या माध्यमातून तुरुंगवास टाळला. मात्र 28 डिसेंबर रोजी संध्याकाळी न्यायालयाने त्यांच्या जामीन अर्जावर कुठलाही निर्णय न देता सुनावणी 30 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलताच रुग्णालयातील डॉक्टर्सनी सुद्धा केदार यांना अचानक फिट घोषित केले आणि तडकाफडकीने केदारांची रवानगी तुरुंगात झाली.


आता 30 डिसेंबर रोजी सुनील केदार यांना नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयातून जामीन मिळते का? तसेच आमदारकी वाचवण्याच्या प्रयत्नात न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी, केदारांच्या मागणीवर न्यायालय काही दिलासा देते का याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. न्यायालयात केदारांना दिलासा मिळेल की नाही हे जरी सध्या भविष्याच्या गर्भात असले. पण तरीही सध्या सावनेर पोटनिवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. 


म्हणून सावनेरची पोटनिवडणूक होण्याची शक्यता


प्रशासनिक सूत्रानुसार सावनेर मध्ये पोटनिवडणूक घेतली जाऊ शकते, कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होण्यासाठी फक्त दहा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तसेच  कुठल्याही मतदारसंघाची जागा सहा महिन्यांपेक्षा जास्त रिकामी ठेवता येत नाही, असे कायदेशीर संकेत आहेत. त्यामुळेच सावनेरमध्ये पोटनिवडणूक घेण्यासंदर्भात प्रशासनानं प्राथमिक स्वरूपाची तयारी सुरू माहिती समोर येतेय. पण याबाबत अंतिम निर्णय निवडणूक आयोगच घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 


निवडणूक घेण्यामध्ये अडचणी येण्याची शक्यता


पण सावनेरची ही निवडणूक घेण्यामध्ये काही अडचणी देखील येण्याची शक्यता आहे. सावनेरमध्ये पोटनिवडणूक घेतल्यास महायुतीला पुणे आणि चंद्रपूरला पोट निवडणूक का घेतली नाही याचा उत्तर द्यावं लागेल. पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा गिरीश बापट यांच्या निधनाने मार्च 2023 मध्ये रिकामी झाल्यानंतर लोकसभेला 13 महिने असतानाही पोट  निवडणूक का घेतली नाही, याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल. तसेच  चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची जागा खासदार बाळू धानोरकरांच्या निधनाने मे 2023 मध्ये रिकामी  झाली. लोकसभा निवडणुकीला 10 महिन्याचा कालावधी शिल्लक असताना तिथेही पोटनिवडणूक घेतली गेली नाही. पण सावनेरमध्ये विधानसभेला दहा महिने असतानाही पोट निवडणूक का घेतली असा प्रश्न नक्कीच उपस्थित केला जाईल. 


महाराष्ट्रात नागपूर अनेक अर्थांनी भाजप चा पॉवर सेंटर आहे. तसेच या पॉवर सेंटरमध्ये भाजपनं कुठलीही निवडणूक जिंकणं किंवा पराभूत होणं याचे राजकीय परिणाम संपूर्ण राज्यात पोहोचतात. पोटनिवडणुकी संदर्भात अंतिम निर्णय जरी निवडणूक आयोगाला घ्यायचा असेल तरी त्यासाठी सत्ताधारी महायुतीला होऊ शकणारा राजकीय नफा आणि तोटा लक्षात घेतला जाईल. त्याचप्रमाणे अंतिम निर्णय घेण्यात येईल. 


हेही वाचा : 


सुनील केदार यांच्या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार, सावनेर विधानसभा मतदारसंघात हालचाली सुरू