राडा होता होता वाचला...
सभागृहात बॅनर झळकावण्यावरुन सेना भाजपचे नेते भिडले. त्यानंतर आज थोडक्यात आटोपलं नाहीतर आज राडा झालाच असता अशी प्रतिक्रिया सेना-भाजपच्या आमदारांची होती.
कारण बॅनर झळकवणारे आणि बॅनर झळकल्यावर वेलमध्ये जाणारे सेना भाजपचे आमदार नवे होते. पहिल्यांदाच ते सभागृहात दाखल झाले आहेत. त्यामुळे उत्साही कार्यकर्त्यासारखी 'आली लहर, केला कहर' अशीच परिस्थिती होती.
पण हे प्रकरण झाल्यानंतर दोन्ही पक्षाच्या आमदारांना सर्व वरिष्ठ आमदारांनी 'आक्रमक आमदारांची' समजूत काढली त्यांना या सभागृहाचं महत्व, इतिहास समजून सांगितलं आणि सळसळतं रक्त थंड केलं. त्यामुळे भविष्यात सभागृहात गोंधळ झाला तरी, आज पुढे आलेले आमदार शांत असतील असं चित्र दिसेल.
मंत्रिपदासाठी लॉबिग...
संजय राऊत साहेबांना गाडी, हॉटेलची व्यवस्था काय पाहिजे? ते सांगा आपले नेते नागपूरला येतायंत, त्यांची चांगलीच सोय झाली पाहिजे, या जोशात काही नेते, आमदार होते. या काळजीचं कारण दुसरं तिसरं काही नाही, तर मंत्रिपदासाठी लॉबिग! नागपूरला शिवसेना खासदार संजय राऊत दाखल होण्याआधी अनेकांनी आपली लॉबिंग सुरु केली. पण संजय राऊतांचे बंधू सुनिल राऊत यांनी सर्व व्यवस्था केली होती. सुनिल राऊत त्यांचे दोन आमदार मित्र घेऊन ते नागपूर विमानतळावर दाखल झाले. संजय राऊतांना रिसिव्ह केलं आणि हॉटेलवर घेऊन गेले. आज दिवसभरात अनेकांनी गाठीभेटी घेऊन, नागपूरच्या थंडीची विचारपूस करुन आपली लॉबिंग सुरु केली.
सेशन बनलं फोटोसेशन
बाप रे बाप... सेशन आहे का फोटोसेशनचा अड्डा? काहीच कळत नाही. नवे मंत्री, नवे आमदार रस्त्यानं जात असताना, अचानक एकजण पुढे येतो, बरोबर आमदारांच्या चेहऱ्यासमोर मोबाईल घेऊन जातो. फोटो घेणारा फक्त फोटोत हसत असतो अचानक आलेली ही परिस्थिती पाहुन आमदाराला कळत नाही हसायचं की रडायचं? पण कोणाला नाराज न करता सेशनमध्ये फोटोसेशन जोरदार सुरु आहे. हौसे, नौसे कार्यकर्ते येतात, फोटो काढतात, नंतर विचारतात हे कोणते आमदार आहेत? अशा कार्यकर्त्यांचं करायचं काय? हा प्रश्न उपस्थित होतो. काही कार्यकर्ते तर इतके हौशी असतात की विमानानं खर्च करुन नागपूरला येतात ग्रुपनं फोटो काढतात आणि ताडोबा इकडे तिकडे फिरायला जातात. विधानभवानच्या वास्तूसोबत किमान रोज हजारो लोक फोटो काढतात. त्यामुळे हे सेशन फोटोसेशनचा अड्डा बनला आहे.
मोसंबी ज्यूस आणि मेथी पराठा -
हातात मोसंबी ज्यूस, मेथी पराठा, इकडच्या तिकडच्या गप्पा सोबतीला आमदार साहेब मग काय कार्यकर्त्यांची कॉलर टाईट! नागपूर विधानभवनाच्या बाजुला अनेक ज्यूस सेंटर, बचत गटांचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत. तुम्ही कुठल्याही स्टॉलवर जा तुम्हाला एकतरी आमदार हमखास दिसणार, काही आमदार ग्रुपनं मेथी पराठा खायला एकत्र जातात तर काही एकत्र ज्यूस घेऊन चर्चा करत असतात. वेगळी बाब म्हणजे विधिमंडळात विरोधात असणारे मात्र या स्टॉलवर येऊन एकत्र गप्पा मारतात.
हेही वाचा - पडद्यामागचं अधिवेशन | नागपूर अधिवेशनात आज इंटरेस्टिंग काय घडलं
shivsena | सावरकरांवरून अधिवेशन तापलं | ABP Majha