अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 25 हजाराची मदत दिली जात नाही, तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. यावरुन आज सभागृहात जोरदार गोंधळ झाला. यानंतर सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना विरोधकांवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा शब्द देऊन आम्ही सत्तेवर आलो आहे, मी दिलेला शब्द पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले.
काळिमा लागेल असं वर्तन करु नका!
या सरकारचे पहिले अधिवेशन आहे. यापूर्वी मुंबईत दोन दिवसांचं जे अधिवेशन झाले त्यावेळी काय घडले हे जगासमोर गेलं आहे. काल आणि आज घडलेल्या घटनाही जगासमोर गेल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून माझं आवाहन आहे की सभागृहाला मोठ्या परंपरेचा वारसा लाभलेला आहे. हे वैभव आहे. त्याला काळिमा लागेल असे वर्तन कोणीही करु नये, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिला. तसंच सभागृहात जो प्रश्न उपस्थित झाला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी मी स्वत: रस्त्यावर उतरलो आहे. दिलेला शब्द, वचन पाळणारे लोक आम्ही आहोत.
आता विरोधकांच्यात हातात 'सामना' आला
आज एक आणखी आश्चर्य पाहायला मिळालं. आम्ही 'सामना' बघत नाही, वाचत नाही, अशाच लोकांना हातात 'सामना' घेऊन दाखवावा लागला. यालाच नियतीचा खेळ आहे. 'सामना' आधीच वाचला असता तर ही वेळ आली नसती. आधी 'सामना' आणि शिवसेनेला विरोधक म्हणून पाहत होते. आता विरोधकांच्याच हातात 'सामना' आला आहे. 'सामना' हे सर्वसामान्याचं शस्त्र आहे.
केंद्राकडे साडेपंधरा हजार कोटींची मदत मागितली
राज्याच्या अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सरकारने किती मदत दिली आहे, त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. अतिवृष्टी, कोल्हापूर-सांगली आणि अवकाळी पाऊसग्रस्तांसाठी जवळपास साडे पंधरा हजार कोटी रुपयांची मदत केंद्राकडे मागितली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
केंद्राकडून एक पैसाही आलेला नाही
जे इथे आदळाआपट करतात. त्यांचंच सरकार केंद्रामध्ये आहे. त्यांचेच नेते पंतप्रधान आहेत. जे शेतकऱ्यांसाठी आज सरकारकडे गळा काढत आहेत, त्यांनी जरा तिकडे जाऊन गळा मोकळा केला पाहिजे, गळा मोकळा करणाऱ्यांना गोळ्या मी देतो. पण तिथे केंद्राकडून राज्याकडे येणारी मदत येणं गरजेचं आहे, तो एक पैसाही आलेला नाही. तरी सुद्धा महाराष्ट्र सरकार हे हाताची घडी घालून बसलेले नाही.
साडेचार हजार कोटींचा जीएसटी परतावा आला
केंद्राकडून राज्याला जीएसटीचा 15 हजार कोटी परतावा बाकी होता. ते देत नव्हते. त्या रकमेची मागणी केल्यानंतर सरकार हलू लागले आहे. साडेचार हजार कोटीचा परतावा जीएसटीचा आला. त्यामुळे असे जर सरकर चालायला लागले. तर इथे ठणाणा करुन इथे बोंबाबोंब करुन उपयोग नाही. शिमगा करायचा असेल तर केंद्र सरकारच्या नावे करावा राज्य सरकारच्या नावाने करु नका, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर निशाणा साधला.