मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय. मात्र संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनमध्ये दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली आहेत. यातील काही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाल्या आहेत. या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. आता तर दारु चोरट्यांनी कहरच केला आहे. लॉकडाऊनमध्ये उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त केलेली दारु ठेवलेली गोदामंच चोरट्यांनी फोडली आहेत. एकीकडे पोलिस प्रशासन संचारबंदीसाठी संपूर्ण ताकत लावून उभे असताना दुसरीकडे दारुड्यांच्या वाढत्या उपद्रवाने नवे आव्हान उभे राहिले आहे.


नाशिकमध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने सरकारी गोदाम फोडले
नाशिकमध्ये पॅरोलवर बाहेर आलेल्या आरोपीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोदाम फोडले. हे गोदाम फोडत 3 लाख 24 हजार रूपयांची दारू चोरट्यांनी लांबवली. 68 बॉक्समधून 3284 ड्राय जिनच्या बाटल्यांची चोरी यावेळी त्यांनी केली. या प्रकरणी दोन आरोपी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात आहेत. विशेष म्हणजे यापैकी एक आरोपी नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधून पॅरोलवर सुटून आला आहे. मंगल शिंदे या 19 वर्षीय आरोपीने जेलमधून बाहेर येताच दारुची चोरी केली आहे.

वर्ध्यात चक्क उत्पादन शुल्क विभागाचे गोदामातूनच दारूची चोरी

वर्धा जिल्हा तसा दारूबंदी असलेला जिल्हा. पण, तळीरामांची, अवैध दारू व्यावसायिकांची संख्या इथं कमी नाही. लॉकडाऊनमुळं तळीरामांची मोठी अडचण झालीय. मग, घसा ओला करण्यासाठी चक्क उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामावरच चोरट्यांनी हात साफ केला आहे.  बंदी असली तरीही वर्ध्यात चोरट्या मार्गानं अनेक जण दारू आणतात. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई करताना जप्त केलेला दारूसाठा, मुद्देमाल आरती चौकातील गोदामात ठेवला जातो. चोरट्यांनी चक्क या गोदामालाच लक्ष केलं. गोदामाचे पत्रे वाकवून चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दारूसाठा लंपास केला. यावेळी कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकाला संशयास्पद हालचाली दिसल्यानं अधिकारी आणि पोलिसांना ही माहिती दिली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वर्धा शहर पोलिसांनी गोदाम गाठून चार जणांना अटक केली. यात निलेश फुलहार, मनोज उईके, सुनील वनकर, बबलू उर्फ रविकांत ठाकूर अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. त्यांच्याकडून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. यात एक लाखाची दारू आणि 30 हजारांच्या एका दुचाकीचा समावेश आहे.

नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध सुटला
लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध वारंवार सुटताना दिसतोय. त्यामुळंच नागपुरात गेल्या आठवड्यात 6 दिवसात पाच वेगवेगळे बार आणि दारूची दुकान फोडल्याच्या घटना समोर आल्या होत्या.गेल्या आठवड्यात 6 दिवसात नागपुरात बार आणि दारू दुकानातून महागडी दारू चोरून नेल्याच्या 5 घटना घडल्या होत्या. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री बंद असल्याने तळीराम बैचेन झाल्याचे आणि ते दारू चोरीच्या घटना घडवत असल्याचे दिसून येत आहे.


दारू दुकानं चालू करायचं उद्धव ठाकरेंना सांगा, वृद्धाची आमदारांकडे मागणी 
काही दिवसांपूर्वी परभणीतील जिंतूर येथील बाजारामध्ये गर्दी झाल्यामुळे स्वतः जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर या रस्त्यावर उतरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत होत्या. त्यावेळी एका वृद्धाने चक्क मेघना बोर्डीकर यांना दारूचे दुकान चालू करा, उद्धव ठाकरेंना सांगा आम्ही काय करायचे अशी मागणी केल्याने सर्वजण अवाक् झाले. हा व्हिडीओ सध्‍या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.

व्यसनी लोकं घेताहेत समुपदेशन
लॉकडाऊनच्या या कालावधीत दारु आणि सिगारेट मिळत नसल्याने या गोष्टीचं व्यसन असलेले अस्वस्थ झालेत. त्यामुळं अशा लोकांकडून समुपदेशनासाठी फोन करण्याचं प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत वाढल्याच पुण्यातील मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे. कुठल्याही व्यसनाच्या शारिरीक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. लॉकडाऊनच्या या कालावधीचा उपयोग शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी करुन घेता येऊ शकतो असं डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे.