नागपूर : राज्याच्या विकासाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) तयार करण्यात आला आहे. पण समृद्धी महामार्ग सुरु झाल्यापासून सतत होणाऱ्या अपघातांनीच अधिक चर्चेत आला आहे. या महामार्गावर रोज छोटेमोठे अपघात सुरु असल्याचं चित्र आहे. समृद्धी महामार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर  समृद्धी महामार्गावरील वाहतूक तूर्त थांबवावी अशी याचिका नागपूर खंडपीठात याचिका (Nagpur Court) दाखल करण्यात आली आहे.  या याचिकेची दखल घेत न्यायालयाने राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.


राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गावरच्या गंभीर अपघातांची मालिका थांबताना दिसत नाही . सातत्याने अपघात होत असलेल्या नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर वाहतुकीला परवानगी देण्यापूर्वी सुरक्षाविषयक उपाययोजना करण्यात याव्यात. तसेच सुरक्षिततेच्या समस्यांचे निराकरण होईपर्यंत महामार्गावरून वाहतूक तात्पुरती थांबवण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अनिल वडपल्लीवार यांनी नागपूर खंडपीठात दाखल केली. तज्ज्ञ पॅनलची स्थापना, चिन्हे, वाहन तपासणी, प्रथमोपचार क्लिनिकची स्थापनेसह विविध उपाय याचिकेत सुचवले. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर व न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी राज्य सरकार आणि एमएसआरडीसीला नोटीस बजावत चार आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे.


मृत्यूचा सापळा म्हणून समृद्धी महामार्गाची ओळख


समृद्धी महामार्ग राज्याच्या विदर्भ भागाला राजधानी मुंबईला जोडण्यासाठी असलेला महत्त्वकांक्षी महामार्ग आहे. जवळपास साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेला हा महामार्ग आता मृत्यूचा सापळा म्हणून या महामार्गाची ओळख व्हायला लागली आहे. नागपूर ते मुंबई असा 701 किलोमीटरचा सरळसोट असलेला हा महामार्ग आहे. आतापर्यंत या महामार्गावर जवळपास हजारच्यावर अपघात झाले आहेत. त्यात गंभीर अपघातात 368, चालकाला डुलकी लागल्याने 183, टायर फुटून 51, तांत्रिक कारणांमुळे 22 हून अधिक जणांचे जीव गेले आहेत.


सरकारने खळबळून जागे होणे आवश्यक


समृद्धी महामार्ग हा जरी राज्याची भाग्य रेषा बदलणारा महामार्ग असला तरी मात्र यावरील होणाऱ्या अपघाताच प्रमाण बघता आता तरी सरकारने खळबळून जागे होणे आवश्यक आहे . त्यामुळे सरकारने जागे होऊन या महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षाविषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे. 


हे ही वाचा :                        


Samruddhi Mahamarg News: समृद्धी महामार्गावर हुल्लडबाजी करणाऱ्यांना चाप बसणार; गाडी थांबवून फोटो, व्हिडीओ काढाल, तर तुरुंगात जाल; महामार्ग पोलिसांचा गंभीर इशारा