Maharashtra Samruddhi Mahamarg News Updates: जर तुम्ही समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg) प्रवास करत असाल किंवा प्रवासाचं नियोजन केलं असेल, तर ही बातमी तुमच्यासाठीच. समृद्धी महामार्गावर आता कुणी रील्स काढले तर थेट तुरुंगाचा रस्ता धरावा लागणार आहे. महामार्ग पोलिसांनी समृद्धी महामार्गावर फोटो किंवा व्हिडीओ काढणाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे. 500 रुपयांच्या  दंडासोबत 1 महिन्यांच्या कारावासाचा इशारा महामार्ग वाहतूक पोलिसांकडून देण्यात आला आहे.


समृद्धी महामार्गावर काही तरुण फोटो, रील काढण्यासाठी वाहतुकीस अडथळा आणत असल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर गेल्या आठवड्यात फिरत होते. त्यानंतर महामार्ग वाहतूक पोलिसांसह जिल्हा वाहतूक शाखेनं याची गंभीर दखल घेतली आहे. समृद्धीवर हुल्लडबाजी करणाऱ्यांना आता एक महिन्याची कैद आणि दोनशे ते पाचशे रुपयांपर्यंत दंड ठोठावण्याचा इशारा दिला आहे.


काही तरुण जीव धोक्यात घालून दौलताबाद रोडवरील समृद्धी महामार्गावरील पुलावर चढून फोटो आणि रील काढत आहेत. 80 ते 120 किमीच्या वेगानं जाणाऱ्या वाहनांना हात दाखवून वाहतुकीस अडथळा आणतात. असं केल्यास कलम 341 नुसार एक महिना कारावास किंवा 500 रुपये दंड तसेच कलम 283 नुसार सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल असे कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्यात येईल, असं महामार्ग पोलिसांनी सांगितलं आहे. 


समृद्धी महामार्गावर अनेकदा वाहन चालक थांबून फोटो किंवा व्हिडीओ बनवून किंवा सोशल मीडियावर टाकण्यासाठी रिल्स बनवतात आणि यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. 80 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगानं जाणाऱ्या वाहनांना अनेकदा अशा कृत्यामुळे अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता बळावते. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर असे कृत्य करणाऱ्या वाहन चालकांची दखल वाहतूक पोलिसांनी घेतली आहे. त्यामुळे आता समृद्धी महामार्गावर थांबून फोटो किंवा व्हिडीओ शूट कराल तर कलम 341 नुसार, एक महिना कारावास किंवा पाचशे रुपये दंड तसेच कलम 283 नुसार, सार्वजनिक रस्त्यावर कोणत्याही व्यक्तीला धोका किंवा इजा होईल, असं कृत्य केल्यास दोनशे रुपये दंड ठोठावण्याची कारवाई आता वाहतूक पोलीस करणार आहेत.


दरम्यान, समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) सुरु झाल्यापासून या महामार्गावर अपघातांची (Accident) मालिका सुरु आहे. हजारावर अपघात होऊनही आणि दीडशेच्यावर जीव जाऊनही प्रशासनानं कठोर पावलं उचललेली नव्हती. पण आता प्रशासन सतर्क झालं असून नियम मोडणाऱ्यांविरोधात कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. 


मुंबईपर्यंत समृद्धी महामार्ग कधीपर्यंत पूर्ण होणार?


सध्या नागपूर ते शिर्डी असा 501 किमीचा टप्पा सुरू आहे. शिर्डी ते भिवंडी या टप्प्याचं काम अजूनही सुरू आहे. सिन्नर ते कसारा टप्प्यात 12 बोगदे आणि 16 छोटे पूल उभारावे लागणार आहेत. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला होण्याची शक्यता आहे. इगतपुरी ते भिवंडीजवळील आमने गाव हा शेवटचा टप्पा डिसेंबर अखेरीस खुला केला जाणार असल्याची माहिती आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यावरच मुंबईकरांना समृद्धी महामार्गाचा पूर्ण लाभ घेता येईल.