नागपूर : सना खान (Sana Khan) यांच्या हत्या प्रकरणात आज नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा (Sanjay Sharma) यांना चौकशीसाठी नागपुरात बोलावले आहे. नागपूर पोलिसांनी त्यांना त्या संदर्भात नोटीसही दिली आहे. मात्र आमदार संजय शर्मा आज चौकशीसाठी येणार नसल्याची खात्रीलायक माहिती आहे. मतदारसंघात काही काम असल्याने आज नागपुरात येणे शक्य नसल्याचे त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवले आहे.
सना खान यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित साहू आमदार संजय शर्मा यांच्याशी संबंधित असल्याचे बोलले जाते. जबलपूर परिसरात अमित साहू त्यांचा समर्थक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे सना खान प्रकरणाशी संबंधित काही माहिती आमदार संजय शर्मा यांच्याकडे आहे का? तसेच दोन ऑगस्टला सना खान यांची हत्या केल्यानंतर अमित साहू त्यांच्या आश्रयाला होता का? याची चौकशी करण्यासाठीच नागपूर पोलिसांनी आमदार शर्मा यांना नागपुरात बोलावले आहे.
मतदारसंघातील कामांमुळे चौकशीसाठी नागपुरात येणे अशक्य : आमदार संजय शर्मा
नागपूरमधील भाजप नेत्या सना खान यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, या प्रकरणात रोज नवीन माहिती समोर येत आहे. सना खान यांच्या हत्येनंतर अमित साहू ज्या ज्या लोकांच्या संपर्कात आला होता त्यांची माहिती पोलिसांनी काढली आहे. त्यापैकी काही लोकांनी अमित साहूला आश्रय दिले होते आणि त्याच अनुषंगाने मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना चौकशीसाठी बोलावल्याचे पोलीस उपायुक्त राहुल मदने म्हणाले. मात्र आज तरी आमदार संजय शर्मा यांनी पोलिसांच्या चौकशीकडे पाठ फिरवली असून मतदारसंघाच्या कामांमुळे नागपुरात येणे शक्य नसल्याचे कळवले आहे.
हनी ट्रॅपचा आरोप
सना खान अपहरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्णपणे उलगडा झालेला नाही. मात्र, आता त्याच प्रकरणात हनी ट्रॅपचा नवा आरोप समोर आला आहे. नागपूर पोलिसांनी सना खान यांच्या हत्या प्रकरणातला मुख्य आरोपी अमित साहू आणि त्याच्या काही अज्ञात सहकाऱ्यांच्या विरोधात नागपूरच्या मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवत हनी ट्रॅप केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, हनी ट्रॅपच्या प्रकरणात आरोपींनी सना खान यांचा वापर केला की नाही हे पोलिसांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. अमित साहू आणि त्याचे सहकारी पीडित महिलेला काही लोकांकडे पाठवून त्यांच्या संबांधाचे व्हिडीओ बनवून खंडणी वसूल करत होते, अशी तक्रार आपल्याकडे आली, त्यानंतर आपण या प्रकरणी तपास करून हनी ट्रॅप प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा