Nagpur University News :  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University) गेल्या अनेक वर्षांपासून प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या संख्येने रिक्त आहेत. येत्या तीन ते सात जानेवारीला विद्यापीठामध्ये इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, इतक्या मोठ्या आयोजनात या रिक्त पदांमुळे विद्यापीठाला फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 
विद्यापीठामध्ये 941 मंजूर पदांपैकी 373 पदे रिक्त आहेत. त्यात प्राध्यापकांची एकूण 465 मंजूर पदे आहेत. त्यापैकी केवळ 243 पदे भरण्यात आली आहेत. अद्यापही 222 पदे रिक्त आहेत. यात सहायक प्राध्यापकांची सर्वात जास्त 68 तर सहयोगी प्राध्यापकांची 46 पदे रिक्त आहेत. याशिवाय इतर प्राध्यापकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपासून प्राध्यापकांची भरती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. काही विभागांना तर नियमित प्राध्यापकच नसल्याने त्याची धुरा प्रभारींच्या भरवशावर आहे. परिणामी प्राध्यापकांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे. 


दुसरीकडे विद्यापीठात गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीचा बॅकलॉग आहे. तृतीय श्रेणीत रिक्त पदांचे प्रमाण 151 एवढे आहे. विद्यापीठात तृतीय श्रेणीची 476 मंजूर पदे आहेत. यापैकी 325 पदे भरली असून 151 पदे रिक्त आहेत. त्याची टक्केवारी 31 एवढी आहे. रिक्त पदांमध्ये निम्न श्रेणी लिपिकांची 64, उच्च श्रेणी लिपिकांची 15 तर निवड श्रेणी लिपिकांची 15 पदे आहेत. यामध्ये विद्यापीठातील पदव्युत्तर विभाग व संचालित महाविद्यालयात शिक्षकांची 47 टक्के पदे रिक्त आहेत. शासनाने सेवानिवृत्तीची मर्यादा 62 वरून 60 केल्याने विभागातील बरेच प्राध्यापक, कर्मचारी सेवानिवृत्त झाले. यातूनच रिक्त पदांच्या संख्येत वाढ झाली. याचा फटका प्रशासकीय कामावरही पडत आहे. 


कंत्राटींवर सायन्स काँग्रेसची धुरा 


विद्यापीठावर इंडियन सायन्स काँग्रेसच्या आयोजनाची जबाबदारी आहे. अशावेळी संपूर्ण विद्यापीठ त्यात व्यस्त आहे. बहुतांशी कंत्राटी कर्मचाऱ्यांवर त्याचा भार आहे. त्यामुळे विद्यापीठाची मोठी कसोटी लागणार असल्याचे दिसून येत आहे. 


मंजूर पदांबाबत...



  • विद्यापीठातील एकूण मंजूर पदे -941

  • रिक्त पदे - 373

  • प्राध्यापकांची एकूण मंजूर पदे - 465

  • भरलेली पदे - 243

  • रिक्त पदे - 222

  • शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे - 476

  • भरलेली पदे - 325

  • रिक्त पदे- 151 


ही बातमी देखील वाचा...


 नागपूर जिल्ह्यात फक्त तीन विधानसभा मतदारसंघांना निधी; सत्ताधारी पक्षाला झुकते माप


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI