नागपूर : मुंबईत झालेल्या संघ कार्यकारिणीच्या बैठकीनंतर अयोध्येतील राम मंदिर मुद्द्याला पुढे न्यायला संपूर्ण संघ परिवार सज्ज झाला आहे. कायदा करा किंवा अध्यादेश काढा, पण मंदिराचं निर्माण सुरु करा, असं म्हणत नागपुरात पहिली हुंकार रॅली 25 नोव्हेंबरला आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी अयोध्या आणि बंगळुरु येथे ही दोन अजून हुंकार सभा होणार आहेत.


25 नोव्हेंबर रोजीच उत्तर, मध्य आणि दक्षिण भारतात एकत्र अभियान सुरु केलं जाईल. पुढची रॅली थेट दिल्लीत आयोजित केली जाणार आहे. ऋतुंबरा आणि 4 शंकराचार्य ही उपस्थित राहतील. या हुंकार सभेत मागणी एकच केली जाणार आहे, की केंद्र शासनाने कोर्टाची वाट न पाहता अध्यादेश काढून किंवा कायदा करुन मंदिर निर्माण सुरू करावे. ही मागणी सरसंघचालक मोहन भागवत यांनी पहिल्यांदा विजयादशमीच्या कार्यक्रमात मांडली होती, मात्र त्यानंतर ज्या झपाट्याने संघ परिवार कामाला लागला आहे. यावरुन एक संपूर्ण ब्लू प्रिंट तयार केल्यावरच भागवत हे बोलले हे स्पष्ट आहे.

आज शनिवारी तयारीसाठी संघाच्या रेशीमबाग हॉलमध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीला संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच भाजपचे नेतेही उपस्थित होते.