नागपूर : मुख्यमंत्र्याच्या नागपुरात गुंडगिरीने कळस गाठला आहे. नागपुरात लागोपाठ दोन दिवसात जबर मारहाणीच्या दोन घटना घडल्या आहेत. ज्यात एका रिक्षाचालकाची हत्या झाली आहे, तर दुसऱ्या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला आहे. या दोन्ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या आहेत.

नागपूरच्या नंदनवन भागातील खरबी परिसरात वर्चस्वाच्या लढाईतून मालवाहू रिक्षाचालकाची हत्या झाली आहे. दोन रिक्षाचालकांनी मिळून एका मालवाहू रिक्षाचालकाची निर्घृण हत्या केली आहे. राजेंद्र देशमुख असे मृत रिक्षाचालकाचे नाव आहे.

राजेंद्र देशमुख यांना आधी मारहाण करत अर्धमेल्या अवस्थेत ऑटोमध्ये खरबी चौकात आणले, आणि चौकात वाहतूक सुरू असताना त्यांना ऑटोच्या बाहेर काढून, लाठ्या काठ्यांनी मारून हत्या केली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात राजेंद्र देशमुखांचा काही लोकांसोबत वाद झाला होता. राजेंद्र यांनी त्यांना मारहाण केली होती. त्यामुळे राजेंद्रचे परिसरात वर्चस्व वाढत असल्याचे पाहत आरोपी गोलू ठाकरे आणि एजाज अनिसने त्यांची हत्या केली आहे.

दुसरीकडे नागपूरच्या जगनाडे चौक परिसरात पाच जणांनी एकास जबर मारहाण केली आहे. त्यात धीरज टेकाडे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.

राहुल धकाते, धीरज टेकाडे आणि नितीन इंगळे जगनाडे चौकातील बारमध्ये दारु पिण्यासाठी दुचाकीवरुन गेले होते. दारु पिऊन बाहेर पडल्यावर 5 जण राहुल आणि त्याच्या मित्राच्या दुचाकीवर बसले होते. त्यावरुन आरोपी आणि राहुल यांच्यात वाद झाला. त्यानंतर राहुल आपल्या मित्रांसह तिथून निघून गेला.

नितीन आणि धीरज परत तिथे आले आणि धीरजने 5 जणांपैकी एकाच्या कानशिलात लगावली. आणि मग त्या तरुणांनी धीरजला बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. राजेश जिवने, उद्देश ऊर्फ दादू पारसी, प्रीतम लोखंडे आणि अभिजीत काळे अशी आरोपींची नावं आहेत.

नागपुरात अशा घटना घडण्याची ही पहिली वेळ नसून यापूर्वीही भरचौकात हत्येचे प्रकार घडले आहेत. गृहमंत्र्यांच्याच नागपुरात कायदा आणि सुव्यावस्थेचे धिंडवडे उडवले जात असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.