Rashtriya Swayamsevak Sangh News : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) प्रत्येकालाच संघाचा स्वयंसेवक मानतो. काही जण आज स्वयंसेवक आहेत आणि इतर येणाऱ्या काळामध्ये स्वयंसेवक बनतील असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर RSS आपल्या शताब्दी वर्षापूर्वी संघटनेच्या व्यापक विस्ताराच्या योजनेवर काम करत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संघासाठी सर्वात आधी भारत (India) आहे. जो जो व्यक्ती त्या भारतासाठी काम करतो तो आमचा असल्याचे भागवत म्हणाले. संघ आज जे काही काम करत आहे, ते संघाचे काम नाही, तर ते संपूर्ण समाजाचे काम आहे. नागपुरात संघ शिक्षा वर्ग तृतीय वर्षाच्या समारोपीय समारंभात ते बोलत होते.


संघाला नावाचा मोह नाही


जर सर्व नागरिक स्वयंसेवकांसारखे काम करू लागले तर संघ मागे हटून जाईल. सर्व नागरिकांनी संघासारखं काम करावं याच उद्दिष्टानं संघ एका संघटनेच्या नावाची पाटी घेऊन काम करत असल्याचे भागवत म्हणाले. संघाला नावाचा मोह नाही असेही मोहन भागवत म्हणाले. आपल्या याच भाषणात सरसंघचालकांनी हिंदू कोण आहेत या संदर्भातही सखोल व्याख्या केली. असा प्रत्येक व्यक्ती जो भारताला आपला मानतो, भारताची भक्ती करतो, भारताच्या वैविध्यात विश्वास ठेवणाऱ्या संस्कृतीचं पालन करतो, तो हिंदू आहे. मग तो कुठलीही भाषा बोलत असला, कोणाचीही पूजा करत असला, कुठलेही कपडे घालत असला, कुठल्याही परंपरेचा पालन करत असला किंवा कुठल्याही प्रांतात राहणारा किंवा कुठल्याही जातीचा असला तरी तो हिंदुच असल्याचे मत भागवत यांनी व्यक्त केलं.


जगात भारताची स्वीकार्यता वाढतेय


संघासाठी सर्वात आधी भारत आहे. जो जो व्यक्ती त्या भारतासाठी काम करतो तो आमचा आहे. मात्र, जो भारताच्या मार्गात आडवा येतो, तो आमचा नाही असेही मोहन भागवत म्हणाले..जागतिक स्तरावर भारताच्या वाढत्या भूमिकेबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. आज जगात भारताची स्वीकार्यता वाढत आहे. भारताचा आत्मविश्वास वाढला असून, G-20 सारख्या समूहाचं अध्यक्षपद भारताला मिळणं हे साधारण गोष्ट नाही. मात्र, हे फक्त सुरुवात असून आपल्याला अजून भरपूर लांब जायचे आहे असेही भागवत म्हणाले. भारताला आत्मनिर्भर बनायचे आहे. मात्र, त्यासाठी नक्कल करायची गरज नाही असा सल्लाही त्यांनी दिला. 


तृतीय वर्षाचं प्रशिक्षण फक्त नागपुरात


संघ शिक्षा वर्ग संघातील स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्याची दीर्घ प्रक्रिया असून, संघ शिक्षा वर्गाचे प्रथम आणि द्वितीय वर्षाचे प्रशिक्षण देशातील वेगवेगळ्या भागात दिले जाते. मात्र, संघ शिक्षा वर्गाचा तृतीय वर्षाचं प्रशिक्षण फक्त नागपुरातील रेशीमबागमध्येच होते. सुमारे 25 दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात स्वयंसेवकांना बौद्धिक आणि शारीरिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच संघाचे विचार आणि मूल्यांची माहितीही त्यांना दिली जाते. याच प्रशिक्षणानंतर स्वयंसेवक संघाचे प्रचारक बनण्यासाठी सज्ज होतात.


महत्त्वाच्या बातम्या:


मुस्लीम धर्मगुरु उमर अहमद इलियासींच्या मते सरसंघचालक मोहन भागवत हे राष्ट्रपिता.. दिल्लीच्या मशिदीतील तासाभराच्या चर्चेनंतर मुख्य इमामांना साक्षात्कार