Nagpur Metro Phase 2: शहराला ग्रामीण भागाशी जोडणारा महत्वाकांक्षी नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता कन्हान, बुटीबोरी, कापसी, हिंगण्यापर्यंत मेट्रोचा मार्ग मोकळा झाला. 


मागील वर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी या प्रकल्पासाठी 5 हजार 973 कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली होती. नागपूरची वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतुकीच्या आवश्यकतेचा विचार करून शहरातील मेट्रो वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करणाऱ्या मेट्रो रेल प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्यातील 48.29 किलोमीटरच्या मार्गास केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिरवी झेंडी दाखविण्यात आली. राज्य सरकारने 2019 मध्ये या प्रकल्पासाठी 11 हजार 239 कोटी रूपयांच्या खर्चासही मान्यता दिली आहे. आता केंद्राच्या मंजुरीनंतर मिहान ते एमआयडीसी इएसआर, ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान, लोकमान्यनगर ते हिंगणा, प्रजापतीनगर ते कापसीपर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


मेट्रोचा दुसरा टप्पा 43.8 किमीचा असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मेट्रो प्रकल्पाची एकूण लांबी 82 किमी असेल. शहर व ग्रामीण भागाला जोडण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असून 10 लाखांवर नागरिकांना या टप्प्याचा फायदा होणार आहे. कामठीपर्यंत सहज नागरिकांना जाता येणार आहे. कामठी मोठे शहर असून हजारो रहिवासी नोकरी आणि शिक्षणासाठी नागपूरला येतात. ते मेट्रोचा वापर करून नागपूरच्या कानाकोपऱ्यात जलद पोहोचू शकणार आहे. बुटीबोरी एमआयडीसी जिल्ह्यातील सर्वात मोठी औद्योगिक वसाहत आहे. येथे सुमारे 750 युनिट्स असून सुमारे 50,000 लोकांना रोजगार मिळत आहे. या नागरिकांना कारखान्यांपर्यंत जलद प्रवासाची सुविधा होणार आहे. 


असा होईल विस्तार 


- मिहान ते बुटीबोरी : 18.6 किमी 
- ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हान : 13.0 किमी 
- प्रजापतीनगर ते कापसी : 5.5 किमी 
-लोकमान्यनगर ते हिंगणा :  6.7 किमी


पंतप्रदान मोदी करणार नागपुरात मेट्रोने प्रवास 


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 11 डिसेंबर रोजी नागपूर दौऱ्यावर आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे मेट्रोने (Metro) प्रवास करण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बर्डी परिसरातील झिरो माईल स्टेशन ते खापरी स्टेशन दरम्यान मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता आहे. नागपुरात आल्यावर पंतप्रधान सर्वात आधी अजनी रेल्वे स्टेशनवरील कार्यक्रमास जाणार आहे. तिथून ते मेट्रोने प्रवास करण्याची शक्यता आहे.