नागपूर : येथील मानकापूर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले होते. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरांना पकडले खरे, परंतु या चोरांना पाहून पोलीस चक्रावून गेले आहेत. कारण परिसरात लागोपाठ सात घरफोड्या करुन लाखोंचा मुद्देमाल पळवणारे चोर याच परिसरात एका आलिशान बंगल्यात राहणारे उच्चशिक्षित जोडपं आहे. विशेष म्हणजे दोघे चोरी करताना नवी कोरी कार वापरायचे. शैलेश डुंभरे आणि त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी प्रेयसी प्रिया अशी या जगावेगळ्या चोरांची नावं आहेत.

शैलेश आणि प्रिया कारमध्ये बसून पश्चिम नागपुरातील विविध वस्त्यांमध्ये घरफोड्या करत होते. हे दोन्ही चोर उच्चशिक्षित आहेत. शैलेश डुंभरेने एमबीए केले आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत तो एका कॉस्मेटिक्स कंपनीत चांगल्या पदावर कार्यरत होता. मात्र, झटपट श्रीमंत होण्याच्या नादात त्याने नोकरी सोडून गुन्हेगारीचा मार्ग स्वीकारला.

शैलेशने युट्यूबवरून फारसा आवाज न करता चोऱ्या, घरफोड्या कशा कराव्या याचे प्रशिक्षण घेतले. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रियालाही या कामात सहभागी करून घेतले. धक्कादायक म्हणजे प्रिया ही बीए फाईन आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. दोघांनी त्यांच्या कृत्यांचा कोणालाही संशय येऊ नये म्हणून नागपूरच्या गोरेवाडा परिसरात एक बंगला भाड्याने घेतला होता.

दोघे उच्च शिक्षित असल्याने, दोघांकडे एक कार असल्याने त्यांच्या घर मालकालाही कधीच त्यांच्यावर संशय आला नाही. प्रत्येक चोरीच्या ठिकाणी एक भगव्या रंगाची कार दिसत असल्याचे तपासात समोर आले. परंतु ती कार एका बंगल्यासमोर उभी राहत असल्याने पोलिसांनाही त्यांच्यावर संशय येत नव्हता.

चोरी आणि घरफोडीचे युट्यूब वर प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याचे प्रॅक्टिकल करण्यासाठी पहिल्यांदा त्यांनी स्वतःच्याच घरी चोरी केली. चोरीचा पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी शहरातील विविध परिसरात घरफोडी करायला सुरुवात केली. एकानंतर घरफोडी यशस्वी होत असल्यामुळे आणि त्यात मोठा मुद्देमाल त्यांच्या हाती लागत असल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढत गेला.

मानकापूर आणि आसपासच्या परिसरात एकानंतर एक अशा अनेक चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिसांची झोप उडाली होती. चोरीच्या ठिकाणी दोघेही कारमधून आल्याने जरी त्यांच्यावर कुणालाही संशय येत नसे. मात्र, मानकापूर भागात अनेक चोऱ्यांमध्ये त्याच त्याच भगव्या रंगाच्या गाडीचा उल्लेख आल्याने पोलिसांनी भगव्या रंगाच्या सर्व गाड्यांची यादी तयार केली आणि त्यांच्या मालकांच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केले. त्यात शैलेश आणि प्रियाचाही समावेश होता. त्यामुळे पोलिसांनी कारवर तसेच शैलेश व प्रियावर पाळत ठेवली. एका रात्री दोघे कारमधून रात्री चोरीच्या हेतूने बंगल्याबाहेर पडले. त्यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा त्यांनी गुन्हा कबूल केला.

आतापर्यंत दोघांनी सात ठिकाणी घरफोड्या करून लाखोंचा मुद्देमाल चोरल्याची कबुली दिली आहे. तसाच शहरातील इतर भागात झालेल्या अशाच घटनांचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, एमबीए आणि बीए फाईन आर्ट्ससारखे शिक्षण घेतल्यानंतर आणि चांगल्या नोकऱ्या असतानाही झटपट श्रीमंत होण्यासाठी या तरुणांनी शोधलेला हा शॉर्टकट धक्कादायक आहे.