नागपूर : विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज आणि क्राईम शोज सध्या अनेकांच्या पसंतीचे ठरतायेत. मात्र, नागपुरात या वेब सीरिज आणि क्राईम शोज पोलिसांसाठी नवी डोकेदुखी ठरत आहेत. कारण नागपुरात नवखे गुन्हेगार याच वेब सीरिज आणि क्राईम शोज पाहून गुन्हे करत असल्याचे समोर आले आहे. एकट्या जून महिन्यात घडलेल्या अनेक गुन्हेगारीच्या घटनांमागे वेब सीरिज आणि क्राईम शोजचा वापर गुन्ह्याची योजना बनवण्यासाठी किंवा कट रचण्यासाठी केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.
गुन्हेपूर अशी ओळख निर्माण झालेल्या नागपुरात संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या गुन्ह्याच्या आणि खासकरून हत्येच्या अनेक घटना घडत असतात. एकट्या जून महिन्यातच नागपूर शहर आणि ग्रामीण भाग मिळून 14 वेगवेगळ्या घटनांमध्ये 19 जणांची हत्या झाली आहे. आणि बहुतांशी घटनांमधील आरोपी हे सराईत गुन्हेगार नसले तरी त्यांनी केलेलं कृत्य अतिशय क्रूर आणि मन सुन्न करणारे होते. पोलिसांच्या तपासात यापैकी चार घटनांमधील आरोपी वेब सीरिज किंवा क्राईम शो पाहून गुन्ह्याकडे वळल्याचे आणि गुन्ह्यासाठी नियोजन केल्याचे समोर आले आहे. तर काही आरोपी पॉर्न फिल्मचे आहारी गेल्याचे ही सायबर तपासात समोर आले आहे.
पाचपावली परिसरात बागल आखाड्याजवळ 20 जूनच्या रात्री घडलेले मातूरकर आणि बोबडे कुटुंबातील 5 जणांच्या हत्या प्रकरणाचा आरोपी आलोक मातूरकर युट्युबवर अनेक क्राईम शोज पाहायचा. शिवाय तो पॉर्न फिल्मही खूप पाहायचा. एवढेच नाही तर मेहुणीला आपल्या नियंत्रणात ठेवण्यासाठी तो वशीकरण संदर्भात व्हिडीओज पाहत असल्याचे पोलिसांच्या सायबर तपासात समोर आले आहे.
12 जून रोजी आपल्या आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आरोपी सुरज शाहूने शेजारी राहणाऱ्या 15 वर्षीय राज पांडेचा अपहरण करत त्याच्या काकाचं कापलेलं शीर दाखवण्याची मागणी केली होती. नंतर त्याने 15 वर्षांच्या राजची हत्या केली होती. तो क्रूरकर्मा सूरज शाहू क्राईम शो पाहायचा आणि एक वेब सीरिज पाहूनच त्याला या गुन्ह्याची युक्ती सुचल्याचे तपासात समोर आले आहे.
4 जून रोजी पिपळा फाटा परिसरात बंदुकीच्या धाकावर दोन तास बिल्डर असलेल्या वैद्य कुटुंबाला ओलीस ठेवणाऱ्या आरोपीने ही झटपट पैसा कमवण्यासाठी वेब सीरिज पाहूनच ओलीस ठेऊन खंडणी मागण्याची युक्ती लढवल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. 16 जून रोजी नागपूरच्या मनीष नगर भागात राहणाऱ्या डॉक्टर पांडे दाम्पत्याला त्यांच्या दोन मुलांचे अपहरण करण्याठी धमकी देत खंडणी मागणारी संपन्न घरातील गृहिणीनेही क्राईम शो पाहूनच खंडणी मागून त्या पैशातून आपला व्यवसाय सुरु करण्याची युक्ती अमलात आणल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
या सर्व घटनांचा आणखी एक धक्कादायक पैलू म्हणजे सर्वच घटनांचे आरोपी नवखे असून त्यांनी केलेले हे पहिलेच गुन्हे होते. त्यामुळे प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अत्यंत अतिरंजित पद्धतीने कथानक रचलेले आणि गुन्हा घडवल्यानंतर किती सोप्यारितीने आरोपी पसार होऊ शकतो हे वेब सीरिज आणि क्राईम शोमध्ये सहज दाखवले जाते. आणि गुन्हा करण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या नवख्या आरोपींच्या मनोदशेवर ते खोलवर परिणाम करतात आणि ते गुन्हेगारीच्या चिखलात उतरतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.
नागपुरात हत्या आणि त्यासारखे गंभीर गुन्हे काही नवीन नाही. त्यामधील चार घटनांच्या तपासात वेब सीरिज आणि क्राईम शोजचे दुष्परिणाम असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. इतक्यात तर उपराजधानी नागपुरात नवीन गुन्हेगारांकडून अत्यंत भयावह गुन्हे घडवल्याच्या अनेक घटना समोर येत असून नागरिक आणि पोलिसांसाठी ती जास्त चिंतेची बाब आहे. आणि जर गुन्ह्याची वृत्ती असूनही गुन्हा घडवण्याची हिम्मत नसलेल्या नवख्या गुन्हेगारांना अतिरंजित पद्धतीने चित्रित केलेल्या वेब सीरिज आणि क्राईम शोज गुन्ह्याकडे घेऊन जाणाऱ्या ठरत असतील तर त्यावर कायद्याने बंधने लादणे समाजाच्या हितासाठी आवश्यक झाले आहे.