Nagpur News :  राज्यात काही भागात गोवर (Measles) ची साथ पसरत असल्याने नागपूर महानगरपालिकेच्या (NMC) आरोग्य विभागातर्फे (Health Department) गोवर संसर्गापासून सुरक्षेच्या दृष्टीने नागपूर (Nagpur) शहरातील बालकांचे प्रतिबंधात्मक लसीकरण अभियान राबविण्यात आहे. या अभियानाला अधिक गती मिळावी याकरिता मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील बैठक कक्षात गोवर लसीकरणासंदर्भात जनजागृती बैठक घेण्यात आली. बैठकीत शहरातील विविध अशासकीय सामाजिक संस्था, धर्मगुरू व  युनानी डॉक्टर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 


शहरातील विविध धर्मगुरू, अशासकीय संस्था, सामाजिक कार्यकर्ते व युनानी डॉक्टरांची कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गोवर सध्या स्थितीबाबत साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे यांनी माहिती दिली. शहरातील काही भागात गोवर लसीकरणाबाबत पालकाकडून सहकार्य मिळत नाही. गैरसमजूत व योग्य माहितीच्या अभावातून हे होते. त्याकरिता धर्मगुरूद्वारे गोवर लसीकरणाबाबत आवाहन करण्यात आले व योग्य समुपदेशन आणि जनजागृती करण्यात आली. तर शहरातील सर्व बालकांना गोवर लसीकरण करणे शक्य होईल याकरिता अशासकीय संस्था, सामाजिक कार्यकर्ते महत्वाची भूमिका बजावू शकतात त्यामुळे त्यांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांना करण्यात आले,


याशिवाय युनानी डॉक्टरांना त्यांचे दवाखान्यात उपचाराकरिता येणाऱ्या गोवर संशयित रुग्णांची माहिती त्यानी मनपा आरोग्य विभागास (nagpur municipal corporation) द्यावी आणि 5 वर्षाखालील सर्व बालकांचे गोवरचे लसीकरण झाले असल्याची खात्री करावी. तसेच त्यांचे लसीकरण झाले नाही त्यांना लसीकरणाकरिता प्रवृत्त करावे. असे आवाहन करण्यात आले, यावर पूर्णतः सहकार्य करू, असे आश्वासन युनानी डॉक्टरांच्या संघटनेच्या प्रतिनिधींकडून दिले.


दोन्ही बालकांची गोवरवर मात


शहरात सुरु असलेल्या लसीकरण अभिनयासाठी 930 पेक्षा अधिक आशा वर्कर्स दहाही झोन निहाय घरोघरी जाऊन सर्वेक्षण करीत आहेत. शहरात गोवर लसीकरण सर्वेक्षणामध्ये आतापर्यंत सर्वेक्षण झालेल्या 357666 घरांमधील 5 वर्षाखालील 2097 बालकांना गोवर रुबेलाचा पहिला तर 1868 बालकांनी दुसरा डोस घेतला आहे. आणि 5256 बालकांना 'अ' जीवनसत्वचे डोस देण्यात आले आहेत. सर्व संशयीत गोवर रूग्णाचे रक्तजल नमुने निश्चित निदान करण्याकरिता हैद्रराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात. यात शहरात आढळलेल्या 24 गोवर संशयीत रुग्णांपैकी नोव्हेंबर महिन्यात पाठवलेल्या नमुन्यांपैकी दोन रुग्णांचा अहवाल सकारात्मक आला होता. गांधीबाग झोन निवासी 8 वर्षीय आणि 5 वर्षीय बालकाची रिपोर्ट पॉझीटिव्ह आले होता. मात्र सध्या या दोन्ही बालकांनी गोवरवर यशस्वीरित्या मात केली आहे.


गोवरची लक्षणे


ताप, सर्दी, डोळे लाल होणे, खोकला अशी सुरूवातीची लक्षणे असतात. त्यानंतर पुरळ उठायला सुरवात होते, ती कपाळा पासून व नंतर मान व हातपाय पर्यंत पसरते. गोवर हा गंभीर आजार आहे कारण हा इतर आजारांना निमंत्रण देतो. लहान मुलांना खोकल्याचा त्रास सुरु होतो व त्यामुळे घशाला सूज येते निमोनिया होऊ शकतो. गोवर झाल्यानंतर अ जीवनसत्व कमी होते त्यामुळे डोळ्याचे आजार होतात काही वेळा अंधत्व पण येते. कुपोषित बालकास हा आजार होण्याची जास्त शक्यता असते


हे करू नका


गोवर झाल्यास बालकाला इतरांपासून वेगळे ठेवले पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी जाऊ देणे टाळा, बालकांना शाळेत पाठवू नये. कारण हा आजार अतिशय संसर्गजन्य आहे. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ल्या घ्यावा, घरच्या घरी उपचार करू नये, कडू निंबाचा पाला किंवा इतर कोणतेही घरगुती उपचारात वेळ घालवू नये. सर्व डॉक्टरांनी गोवर सदृश लक्षणे असणाऱ्या सर्व बालकाची माहिती महानरपालिका आरोग्य विभागास देणे आवश्यक आहे.


ही बातमी देखील वाचा


Nagpur : देशातील पहिले फोर लेव्हल वाहतूक कॉरिडॉर नागपुरात, पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन; काय आहेत वैशिष्ट्ये