नागपूर : नागपूरमधील निर्बंध 31 मार्चपर्यंत सुरु राहणार अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. या निर्बंधामुळे नागरिकांच्या अर्थतंत्राला/रोजगाराला बाधा पोहोचणार नाही असे आमचे प्रयत्न राहतील, असंही राऊत यांनी सांगितलं. नागपुरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्वपक्षीय आढावा बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार उपस्थित होते.
नितीन राऊत म्हणाले की, "नागपुरात 21 मार्चपर्यंत कडक निर्बंध लावले होते. संसर्ग कमी करण्यासाठी कठोर प्रयत्न केले. आज कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा सर्वपक्षीय आढावा बैठक घेतली. तज्ज्ञांची मतं जाणून घेतली, व्यापारी वर्गाचीही मतं लक्षात घेतली. ज्या सूचना मिळाल्या त्याला अनुसरुन सध्या सुरु असलेले निर्बंध 31 मार्चपर्यंत सुरु राहणार आहेत."
कोरोना लसीकरण वाढवण्याचे आमचे प्रयत्न आहेत प्रतिदिन 40 हजार डोस देण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी लसीकरण केंद्र वाढवले जातील, असंही राऊत यांनी नमूद केलं.
आम्ही नागपुरातील अनेक नमुने दिल्लीतील प्रयोगशाळेत पाठवले होते. मात्र त्याचे निष्कर्ष अजून मिळाले नाहीत. त्यामुळे व्हायरसच्या जिनोम सॅम्पलिंगबद्दल किंवा म्युटेशनबद्दल स्पष्टता नाही. ते निष्कर्ष मिळाल्यानंतरच हे व्हायरसचं म्युटेशन आहे की वेगळे स्टेन आहे हे स्पष्ट होऊ शकणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
31 मार्चपर्यंत वाढवलेल्या निर्बंधामध्ये लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही.
- भाजी दुकान, अत्यावश्यक वस्तू सेवा आता 4 वाजेपर्यंत सुरु राहिल (सध्या 1 वाजेपर्यंत सुरु राहते )
- हॉटेल, रेस्टॉरंटमधून डायनिंग संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील (सध्या बंद होते)
- हॉटेल, रेस्टॉरंटमधून ऑनलाईन पार्सल सेवा रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहिल (आताही 11 वाजेपर्यंत होती)
- अत्यावश्यक वस्तूंचा ठोक पुरवठा करणाऱ्या व्यापाऱ्यांना 4 वाजेपर्यंत दुकान सुरु ठेऊ शकतील. (आता 1 वाजेपर्यंत परवानगी होती)
- शाळा महाविद्यालय बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण आणि परीक्षा होईल (आताही बंद आहेत)
- सर्व सार्वजनिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम बंद राहतील (आता ही बंद आहेत)
- लग्न घरगुती पातळीवर 50 पेक्षा कमी उपस्थितांमध्ये होऊ शकतील (आताही अशीच स्थिती आहे)
- अनावश्यक गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाईसाठी पोलिसांना मोकळीक देण्यात आली आहे.