नागपूर : संपूर्ण लॉकडाऊन हा काही पर्याय नाही, गरिबांचं यामुळे मोठं नुकसान होतं. लोकांचा रोजगार त्यामुळे बुडतो. बैठकीत आम्ही हीच मागणी पालकमंत्र्यांसमोर मांडली आहे. वाटल्यास नियम कडक करुन त्याची अंमलबजावणी सक्तीने करावी, अशी मागणीही आम्ही केली. पालकमंत्र्यांनीही त्याबद्दल सकारात्मकता दाखवली असून अधिकृत घोषणा ते स्वतः करतील, अशी माहिती विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.


नागपुरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील आमदार उपस्थित होते.


संपूर्ण लॉकडाऊनऐवजी कडक निर्बंध लावले जातील, अंतिम घोषणा पालकमंत्री करतील, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीतून बाहेर आल्यानंतर दिले.


ते पुढे म्हणाले की, "बैठकीत लसीकरण केंद्र वाढवण्याबद्दलही चर्चा झाली आहे. आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरु करण्याबाबत चर्चा झाली. तसंच एनजीओची मदत घेऊनही काही केंद्र चालवण्याबद्दल काही करता येईल का हा विषयही चर्चिला गेला. आधी ज्या खाजगी रुग्णालयात कोविड वॉर्ड सुरु करण्यात आले होते, मात्र दरम्यानच्या काळात ते बंद केले गेले तेही सुरु करण्याबद्दल चर्चा करण्यात आली." 


हाय डिपेंडेन्सी बेडस वाढवण्याची आम्ही मागणी केली आहे. त्याबद्दल प्रशासनाने 25 मार्चपर्यंत 300 बेडस वाढवण्याचे आश्वासन दिले आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. सोबतच नागपुरात कोरोनाविरोधातील लढ्याचं काम संथगतीने सुरु आहे, असं आम्हाला वाटतं, त्यामुळे त्याची गती वाढवली पाहिजे, असं फडणवीसांनी नमूद केलं.