Nagpur News : नागपुरात (Nagpur Crime) दिवसभर विविध भागांत फिरुन घरांचे रेकी करणं आणि बंद घर सापडल्यावर रात्री घरफोडी करणाऱ्या चोरांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आलं आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हेशाखेने या सराईट चोरांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीतील तीन सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांनी प्राथमिक चौकशीत दोन गुन्ह्यांची कबुली दिली आहे. मात्र, आरोपी सराईत चोरटे असून, त्यांनी याहून जास्त चोऱ्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. परिसरातील नागरिकांना संशय येऊ नये म्हणून चोरट्यांकडून रेकी करण्यासाठी कारचा उपयोग केला जात होता.
10 डिसेंबर ते 24 डिसेंबरदरम्यान अजनी येथील माँ रेणुका विहार येथे राहणाऱ्या राजेंद्र उके (वय 63) यांच्याकडे चोरी झाली होती. चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, कॅनॉन कंपनीचा कॅमेरा, रोख 50 हजार रुपये चोरून नेले होते. गुन्हेशाखेकडून या प्रकरणात समांतर तपास सरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही, तसेच इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्सच्या माध्यमातून तीन आरोपी असल्याचा निष्कर्ष काढला.
खबऱ्यांकडून मिळालेल्या टिपच्या आधारावर पथकाने सापळा रचला आणि अक्षय नागोराव दारोकार (वय 24, किनखेडा, सावनेर), राहुल संतोष नायडू (वय 28, किनखेडा, सावनेर) आणि फैजान समीरुल्ला खान (वय 26. दवलामेटी, वाडी) यांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्यांनी अजनी आणि बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस उपायुक्त मुमक्का सुदर्शन, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित, पोलीस निरीक्षक मयूर चौरसिया, बलराम झाडोकार, राजेश देशमुख, प्रवीण रोडे, रवी अहीर, प्रशांत गभणे, नरेंद्र ठाकूर, कुणाल मसराम, नीलेश श्रीपात्रे, सुधीर पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
चोरीच्या पैशाने नशा
तिनही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांना नशा करण्याचे व्यसन आहे. चोरीच्या पैशांतून ते नशा करायचे. दिवसभर कारने फिरून बंद घरांची रेकी करायचे आणि रात्री घरफोडी करायचे, असं पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे.
दिवाळीत काढले नागपूरकरांचे दिवाळे
घरफोडी चोरट्यांवर आळा घालण्यात पोलिसांना अपयश आले असल्याचे दिसून आले होते. नागपुरात दिवाळीच्या 14 दिवसांच्या कालावधीत तब्बल 35 घरफोडींचे गुन्हे उघडकीस आले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामध्ये सर्वाधिक घरफोड्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या होत्या.
गाजलेले प्रकरण...
शहरातील भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गवई यांच्या घरी चोरट्याने शिरुन लाखोंचे दागिने आणि रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना दीड वर्षांपूर्वी घडली होती. मात्र, त्या घटनेनंतर अद्याप चोराचा सुगावा लागला नाही. याशिवाय बजाजनगरातील बंदुकीच्या साहाय्याने टाकलेल्या दरोड्याचाही सुगावा लागलेला नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :