Nagpur Congress News : सध्या देशात महागाईमुळे नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या चटक्यामुळे घरात चांगले पौष्टिक अन्न शिजवणे गृहीणींसाठी कठीण झाले आहे. दुसरीकडे वाढलेल्या इंधनाचे दर आणि बेरोजगारी सारखे महत्त्वाचे मुद्दे असताना, भाजपकडून फक्त, धर्म, जाती आणि रंगांच्या नावावर राजकारण सुरु आहे. हे सामान्य नागरिकांना समजले आहे. त्यावरुन देशात धर्म आणि जातीच्या नावावर जास्तदिवस राजकारण चालणार नाही, जनताच यांना घरचा रस्ता दाखवेल अशी टीका कॉंग्रेस उत्तर प्रदेश विधिमंडळ नेत्या आराधना मिश्रा (Aradhana Mishra) यांनी केली. प्रजासत्ताक दिनी सुरू होत असलेल्या कॉंग्रेसच्या 'हात से हात जोडो' अभियानाच्या शुभारंभप्रसंगी नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.


पुढे त्या म्हणाल्या, जगातील तिसरी अर्थव्यवस्था असा ठेंभा मिरविणाऱ्या भाजपने या देशाची धुळधाण केली आहे. देशाच्या विकासाचा पाया माजी पंतप्रधान दिवंगत पंडित जवाहरलाल नेहरूंनीच रचला आहे. भाजपने तर देश विकायला काढला आहे. नेहरूंनी शिक्षण, आरोग्य, उद्योग व व्यवसायाची भरभराट केली. विकासाचे नवरत्न उभे केले. आज याच नवरत्नाला पंतप्रधान मोदी विकत आहेत. हरीत व धवल क्रांती कॉंग्रेसने आणली. आयआयटी, आयआयएम ही कॉंग्रेसची देण आहे. भाजप तर देशाच्या विकासाच्या पाया नेस्तनाबूत करीत असल्याचा आरोप उत्तर प्रदेश विधीमंडळ कॉंग्रेस नेत्या आराधना मिश्रा यांनी केला.


मोदींनी उद्योगपती मित्रांना खैरात म्हणून वाटल्या सरकारी कंपन्या...


2014 मध्ये 10 टक्के श्रीमंतांकडे 64 टक्के संपत्ती होती. आता 50 टक्के संपत्ती 5 टक्के धनधांडग्यांकडे आहे. कॉंग्रेसने 72 हजार शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. मोदींनी त्यांच्या उद्योगपती मित्रांची 72 हजार कोटींचे कर्ज माफ केले. बंदरे, विमानतळ, रेल्वे, वीज उत्पादन केंद्र, कोळसा खाणी मित्रांना खैरात म्हणून वाटल्या. बंदरांमध्ये अरबो रूपयांचे जप्त होणारे ड्रग्जचे व्यवहार कोणाचे असा सवाल करीत मिश्रा यांनी गेल्या 8 वर्षात केवळ अडानी, अंबानी यांचाच विचार झाल्याचा आरोप केला. पत्रपरिषदेला आमदार व शहर कॉंग्रेसाध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thakre) , विशाल मुत्तेमवार (Vishal Muttemwar), उमाकांत अग्नीहोत्री, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.


रोजगार, महागाई अत्युच्च शिखरावर


देशात सर्वाधिक नुकसान तरूणांचे होत आहे. दरवषीं 2 कोटींचे रोजगार कुठे आहेत? 10लाख सरकारी नोकरी रिक्त असताना कोरोना, नोटबंदीमुळे नोकऱ्या हिसकावल्या. महागाई, रोजगार आज अत्युच्च शिखरावर आहे. जीएसटीच्या नावावर व्यापाऱ्यांकडून वसुली सुरू आहे. जीवनावश्यक वस्तुंचे दर गगनाला भिडले आहेत. 6 कोटी शेतकऱ्यांचा सन्मान निधी अडकला. 90 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.महिलांवरील अत्याचार 27 टक्के वाढले. 2000 वर्ग किमीपर्यंत चीनने भारतात घुसखोरी केली आहे. वसाहत उभारली आहे, पंतप्रधान मोदींना काहीच वाटत नाही. बेरोजगारी देशाचा मुद्दा आहे. मुख्य मुद्दे भरकटविण्यासाठीच भाजप वेगवेगळे मुद्दे पुढे करते. राहूल गांधींच्या भारत जोडो यात्रेचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, अशी अपेक्षाही मिश्रा यांनी व्यक्त केली.


कार्यकतें घरोघरी जातील


भारत जोडो यात्रेचा एक भाग म्हणून 26 जानेवारीपासून देशभरात कॉंग्रेसचे 'हात से हात जोडो' अभियान सुरू होत आहे. राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर एकाचवेळी हे अभियान सुरू होत आहे. नकारात्मक राजकारणाला प्रेम, एकतेचे प्रत्युत्तर म्हणून भारत जोडो यात्रा होती. यात तरूण, महिला, वृध्द व मुलेही सहभागी झाली. कॉंग्रेसशी संबंधीत नसणारे दिल्लीतील 27 हजार सिव्हील सोसायटी यात्रेत होते.आता कार्यकर्त्याची वेळ आहे. घरोघरी जाऊन देशातील ज्वलंत प्रश्न, कॉंग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी तीन वर्षात केलेले काम व आगामी दोन वर्षातील प्रस्तावित कामे मांडून नागरिकांचे जीवाभावाचे प्रश्न या अभियानातून सोडविण्यावर भर दिला जाणार असल्याचे मिश्रा म्हणाल्या.


ही बातमी देखील वाचा...


Ganesh Jayanti 2023: नागपुरात बाप्पासाठी 1100 किलोंचा बुंदीचा लाडू ; दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी