Nagpur Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभाग चालू आर्थिक वर्षात नागपूर (Nagpur) जिल्ह्यात धडक मोहीम राबवत असून 1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 2 कोटी 42 लाख 85 हजार 604 रुपये किमतीचा मुद्देमाल (दारू, वाहने) जप्त केला आहे. शहरासह प्रत्येक तालुक्यात होणाऱ्या विभागाच्या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये धडकी भरली आहे. 463 केसेसमध्ये जप्त केलेली 60 लाखांची दारू बेवारस होती, तर एप्रिल ते डिसेंबर या काळात 2134 आरोपींना अटक केली. मात्र तरीही शहरासह ग्रामीण भागांतही अनेक 'खास' ठिकाणी अवैध दारु विक्री जोरात असून काहींवर विभागाची विशेष कृपा असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे.
निवडणूक काळात सर्वाधिक कारवाई
राज्य उत्पादन शुल्क विभागाने नोव्हेंबरमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात 301 केसेस केल्या. त्यात 275 आरोपींना अटक आणि चार वाहने जप्त केली होती. या केसेसमध्ये 42 लाख 93 हजार 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मात्र शहरात वर्षभर 'ड्राय डे' असूनही रात्री उशिरापर्यंत दारुविक्री करणाऱ्या अनेकांवर कारवाई टाळण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला आहे.
उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
सहा विभागांसह दोन भरारी पथके आणि रामटेक चेक पोस्टवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली आहे. भरारी पथक एकनं 70 लाख आणि पथक दोनं 43.93 लाख. तसेच चेक पोस्टवर 43.55 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे
2780 जणांना ठोकल्या बेड्या
नागपूर जिल्ह्यात निरीक्षक-ए विभाग ते निरीक्षक- एफ असे एकूण सहा विभाग, दोन भरारी पथके आणि रामटेक चेक पोस्ट अशा एकूण नऊ ठिकाणी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2022 या काळात 3305 केसेस करण्यात आल्या. त्यात 2706 क्लेम आणि 599 अनक्लेम दाव्यांची नोंद आहे. या केसेसमध्ये 2780 जणांना अटक करून 56 वाहने जप्त केली. वर्षभरातील या कारवाईत अधिकाऱ्यांनी 3 कोटी 12 लाख 76 हजार 163 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
60 लाखांची दारू सोडून विक्रेते पळाले
गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या कारवाईत अवैध दारू उत्पादक आणि विक्रेते माल सोडून पळून जातात. या मालावर दावा करणारे पुढे येत नाही. त्यामुळे या मालाला बेवारस समजले जाते. कारवाईत जवळपास 60 लाख रुपयांची बेवारस दारू जप केल्याची माहिती आहे.
वर्षभरात 2.42 कोटींची दारू जप्त
1 एप्रिल ते 31 डिसेंबर 2022 या नऊ महिन्यांत 2 कोटी 42 लाख 85 हजार 604 रुपये किमतीचा मुद्देमाल (दारू, वाहने) जप्त केला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :