Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) हे शेती प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. नागपूर (Nagpur) येथील विधानभवनावर काढण्यात येणाऱ्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात झाली आहे. शेकडो शेतकऱ्यांसह तुपकर यांचा ताफा महाराजबाग चौकात अडवण्यात आला आहे. याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र, रविकांत तुपकर विधानभवाकडे जाण्यावर ठाम आहेत.
रविकांत तुपकर हे आंदोलक शेतकऱ्यांसह विधानभवनाच्या दिशेने निघाले आहेत. त्याच्यासह आलेल्या आंदोलनकांच्या वाहनांचा ताफा अमरावती रोडवरील गोंडखैरी येथून नागपूर शहराच्या दिशेने निघाला आहे. आम्ही विधानभवनात आत शिरण्यासाठी नागपूरला आलो असल्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
'या' मुद्यावरुन रविकांत तुपकर आक्रमक
रविकांत तुपकर हे कापूस आणि सोयाबीन प्रश्नावरुन आक्रमक झाले आहेत. या दोन्ही पिकांच्या दरात मोठी घट झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. नुकसानभरपाई आणि पीक विम्याचे पैसे तात्काळ जमा व्हावं, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
कापूस आणि सोयाबीनच्या दरात वाढ करावी, सोयाबीन-कापसाचे धोरण ठरविण्यासाठी कायमस्वरूपी अभ्यासगट स्थापन करून वर्षातून दोन बैठका घ्यव्यात. वस्त्रोद्योगाला सॉफ्टलोन द्यावे. खाद्यतेलामध्ये पामतेल मिक्स करण्यावर बंदी घालण्याची आग्रही मागणी तुपकर यांच्याकडून करण्यात आली आहे. ज्याप्रमाणे गारपीट आणि अतिवृष्टी झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करतात, त्याचप्रमाणे ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदलामुळं तूर, हरभरा आणि इतर पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन 100 टक्के नुकसान भरपाई देण्याची मागणीही तुपकर यांनी केली आहे. तसेच, दूध उत्पादकांना स्पेशल पॅकेज व दुध भूकटीला निर्यात अनुदान देण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.
कांदा निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी
कांदा निर्यातबंदीला तुपकरांनी तीव्र विरोध केलाआहे. निर्यातबंदी मागे घेण्याची आग्रही मागणी करण्यात आली आहे. सोबतच कांदा उत्पादकांच्या तीव्र भावना देखील मांडण्यात आल्या. निर्णय न घेतल्यास हजारो कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरतील असेही तुपकर म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: