Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtek Lok Sabha Constituency) मागील काही दिवसांत अधिकच चर्चेत आला असून, याच मतदारसंघात काँग्रेसला (Congress) आणखी एक झटका बसला आहे. रश्मी बर्वेंचा (Rashmi Barve) उमेदवारी अर्ज बाद झाल्याने अडचणीत आलेल्या काँग्रेसने रश्मी बर्वेंच्या पतींना मैदानात उतरवले आहे. असे असतानाच आता काँग्रेस नेते किशोर गजभिये (Kishore Gajbhiye) यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही परिस्थितीत स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही, काँग्रेसने वाटल्यास हवी ती कारवाई करावी अशी थेट भूमिका देखील गजभिये यांनी घेतली आहे. 


याबाबतीत बोलतांना किशोर गजभिये म्हणाले की, "उमेदवारी परत घेण्यासाठी अखेरच्या दोन दिवसांमध्ये प्रचंड दबाव होता. वेगवेगळ्या पद्धतीचे लोक येऊन भेटून उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव आणत होते. त्यामुळेच अखेरच्या दिवशी फोन बंद करून अज्ञात ठिकाणी गेल्याची माहिती किशोर गजभिये यांनी दिली. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी माझ्यावर केलेल्या अन्यायाविरोधात माझा संघर्ष असून, काँग्रेस विरोधात संघर्ष नाही असे स्पष्टीकरणही गजभिये यांनी दिले. 


रश्मी बर्वेच्या स्वरूपात निवडलेला उमेदवार योग्य नव्हता


काँग्रेस पक्षाने रश्मी बर्वेच्या स्वरूपात निवडलेला उमेदवार योग्य नव्हता, त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र बोगस असल्याचे आधीच पक्षश्रेष्ठींना सांगितले होते. तरी मला उमेदवारी देण्यात आली नाही. हे पक्षाचं नुकसान करणारे तर आहेतच माझ्यावर अन्याय करणारेही आहे. याच अन्यायाविरोधात माझा संघर्ष असल्याचे गजभिये म्हणाले. काहीही झालं तरी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही असेही गजभिये म्हणाले. 


काँग्रेसची अडचणीत वाढ होणार? 


रामटेक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी किशोर गजभिये पहिल्यापासून इच्छुक होते. मात्र, पक्षाकडून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे उमेदवारी जाहीर झाल्यापासून उमेदवारी दाखल करेपर्यंत किशोर गजभिये यांनी रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीला विरोध केला. रश्मी बर्वेंचा उमेदवारी अर्ज बाद होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर देखील रश्मी बर्वे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यामुळे किशोर गजभिये यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल करत बंडखोरी केली. तसेच आता उमेदवारी मागे घेणार नसल्याची देखील त्यांनी भूमिका घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसची अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


Mahayuti Seat Sharing : महायुतीमधील 'या' चार मतदारसंघामुळे जागावाटपाचा तिढा वाढला, वर्षावर पहाटे 3 वाजेपर्यंत बैठका