नागपूर : लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजपची युती झाली आहे. मात्र राज्यातील त्यांचा महत्त्वाचा मित्रपक्ष रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले नाराज झाले आहेत. नागपुरात बोलताना रामदास आठवलेंनी भाजप-शिवसेना युतीत जागा न मिळाल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.


राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा भेटीसाठी निरोप आल्याचं सूचक वक्तव्य आठवलेंनी यावेळी केलं. सध्या तरी मी भुजबळ यांना भेट नाकारली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माझे शत्रू नाहीत, त्यांना भेटायला माझ्यावर बंदी नाही. मी त्यांना कधीही भेटू शकतो, असं सूचक वक्तव्य करुन आठवले यांनी त्यांची पुढची दिशा अनिश्चित असू शकते, असे संकेत दिले आहेत.


मी मंत्रीपदासाठी काम करत नाही : आठवले


शिवसेना-भाजपमध्ये युती झाली, मात्र या युतीत मित्रपक्ष असलेल्या रिपाइंला एकही जागा सोडण्यात आली नाही. याबद्दल बोलताना रामदास आठवले म्हणाले, मी काही मंत्रीपदासाठी काम करत नाही. माझे मंत्रीपद असेल किंवा नसेल मात्र, राजकारण सन्मानाने केलं पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचं आठवलेंनी यावेळी सांगितलं. राजकारणात सर्व मार्ग खुले असतात असे संकेतही आठवलेंनी दिले.


गुलाम म्हणून शिवसेना-भाजपसोबत राहणार नाही, असा इशाराही आठवलेंनी दिला. युतीची घोषणा करण्यापूर्वी आमच्यासोबत चर्चा करणे आवश्यक होते, मात्र तसे झाले नाही. युतीची खलबते पार पडल्यानंतर भाजपवाले म्हणतात की शिवसेना तुमच्यासाठी जागा सोडायला तयार नाही. मात्र, शिवसेना का जागा सोडत नाही, त्यांना आमची मते नको आहेत का? असा सवाल रामदास आठवलेंनी विचारला.


व्हिडीओ