नागपूर : राज्यसभेच्या जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळणार यावरुन सगळ्याच पक्षात चढाओढ पाहायला मिळत आहे. काँग्रेसकडून राज्यसभेच्या उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याची जोरदार चर्चा रंगली आहे. काँग्रेसकडून उमेदवारीची माळ प्रकाश आंबेडकर यांच्या गळ्यात पडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उमेदवारी देऊन काँग्रेस प्रकाश आंबेडकर यांच्याशी जवळीक साधण्याचे प्रयत्न करणार असल्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. 


प्रकाश आंबेडकर आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांची 15 दिवसांपूर्वी भेट झाली होती. या भेटीमध्ये स्थानिक पातळीच्या निवडणुकीत एकत्र येण्याबाबत त्यांच्यामध्ये प्राथमिक स्तरावर चर्चा झाल्याचं समजतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रादेशिक नेतृत्त्वाशी बोलणार नाही, पक्षश्रेष्ठींसोबतच याबाबत बोलतील अशी प्रकाश आंबेडकर यांची कायमच भूमिका राहिलेली आहे. काँग्रेसची जी मोठी व्होटबँक आहे, त्यांच्या भावना आंबेडकर आणि आंबेडकर कुटुंबियांशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांशी आघाडी झाली तर एक मोठी व्होटबँक आपल्याकडे वळेल, असं काँग्रेसचं मत आहे. यामुळेच काँग्रेस प्रकाश आंबेडकरांना राज्यसभेची जागा देऊ शकते का, अशी चाचपणी सुरु असल्याचं कळतं.


सहा जागांसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत
राज्यसभेचे सदस्य असलेल्या महाराष्ट्रातील सहा जागा रिक्त होत आहेत. शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तर भाजपकडून विनय सहस्त्रबुद्धे, पीयुष गोयल आणि विकास महात्मे यांची मुदत संपत आहे. महाराष्ट्रातील सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक जाहीर झाली आहे. आता या सहा जागांसाठी 31 मे पर्यंत अर्ज करण्याची मुदत असून निवडणूक लागली तर 10 जून रोजी मतदान होईल. राष्ट्रवादीचे प्रफु्ल्ल पटेल, शिवसेनेचे संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाकडून पुन्हा संधी मिळेल अशी शक्यता आहे. तर पीयुष गोयल हे केंद्रीय मंत्री असल्यामुळे त्यांचंही पुन्हा येणं निश्चित आहे. राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून 19 जागा आहेत. यात भाजपचे सात,  राष्ट्रवादीचे चार,  शिवसेनेचे तीन,  काँग्रेसचे तीन,  रिपाई(आठवले गट) एक आणि एका अपक्ष  खासदाराचा समावेश आहे. 



संबंधित बातम्या